आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रुपयाची घसरण होत असल्याने भारतात विदेशी पर्यटकांची संख्या वाढत असली तरी दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई या महानगरांमधील हॉटेल्सचे दर मात्र घसरले आहेत. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांचा आढावा घेतला असता ही बाब समोर आली.
एप्रिल ते सप्टेंबर 2012 च्या तुलनेत 2013 मधील पहिल्या सहा महिन्यांतील हॉटेल्सदराचा आढावा घेणारे सर्वेक्षण (हॉटेल प्राइस इन्डेक्स) नुकतेच ‘हॉटेल्स डॉट कॉम’वर प्रसिद्ध झाले आहे. दहा प्रमुख महानगरांचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला, तेव्हा मागणीपेक्षा रुम्स जास्त उपलब्ध झाल्याने ही घसरण झाल्याचे समोर आले.
चेन्नईतील हॉटेल्सच्या दरात सर्वाधिक आठ टक्के घसरण झाल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले. मागील वर्षी पहिल्या सहा महिन्यांत या शहरात हॉटेल्सचे भाडे सरासरी 6353 होते, ते यावर्षी 5861 वर आले आहे, तर पुणे शहरातील हॉटेल्सचे दर सरासरी 5650 वरून 5383 रुपयांपर्यंत म्हणजेच सुमारे पाच टक्क्यांनी घसरले आहेत.
राजधानी दिल्लीसह जयपूर शहरातील हॉटेल भाडे 4 टक्क्यांनी घसरले आहेत. गतवर्षीच्या सरासरी 6797 रुपयांच्या तुलनेत यावर्षी दिल्लीतील भाडे सरासरी 6511 रुपयांपर्यंत खाली आले आहे, तर जयपूरमधील दर 4839 रुपयांवरून 4646 वर आले आहेत. कोलकात्यातील दर 3 टक्क्यांनी तर मुंबई, हैदराबादेतील दर 2 टक्क्यांनी घसरलो. कोलकात्यात यावर्षी 6269 रुपये, तर मुंबई- हैदराबादेत अनुक्रमे 7971 व 5454 रुपये सरासरी हॉटेल भाडे मिळाले.
देशात हॉटेल्सचे ग्राहक वाढले
एप्रिल ते सप्टेंबर 2013 या काळात रुपयात कमालीची घसरण झाली. याच संधीचा फायदा घेत विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी सरकारने अनेकविध योजना आखल्या, त्याचा पर्यटनवाढीस फायदा झाला. या सहा महिन्यांत देशभरातील हॉटेल्सचे ग्राहक एक टक्क्यांनी वाढले. तर रूम्सचा दर सरासरी 6025 रुपये होता, असे सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आले आहे.
गोवा, कोचीत दर वाढले
पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोवा, केरळमध्ये हॉटेल्सचे दर अनुक्रमे 3 व 4 टक्क्यांनी वाढले आहेत. कोचीत गतवर्षी सरासरी 4931 रुपये भाडे आकारले गेले, तर यावर्षी हेच दर 5123 पर्यंत वधारले आहे, तर गोव्यातील हॉटेल भाडे सरासरी 5225 रुपयांवर गेले आहे. बंगळुरूत एक टक्का एवढी किरकोळ वाढ झाली. गतवर्षी या शहरात हॉटेल भाडे सरासरी 6067 रुपये होते ते यंदा 6133 रुपयांवर गेले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.