मुंबई- नववर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनसाठी पोलिसांनी दिलेली रात्री दीड वाजेपर्यंतची डेडलाइन अन्याय करणारी असल्याचे सांगत हॉटेल व्यावसायिक संघटनेने त्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात आव्हान दिले आहे.
इंडियन हॉटेल्स अॅंड रेस्टारंट असोसिएशन (एएचएआर)ने याबाबत मुंबई हायकोर्टात आव्हान दिले. मुंबई पोलिसांनी 19 व 23 डिसेंबर रोजी परिपत्रक काढून पाच वाजेपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र मुंबई पोलिसांनी काल ती बदलून मध्यरात्री दीड वाजेपर्यंत केल्याचे परिपत्रक काढले. मात्र यापूर्वी पोलिसांनी सादर केलेल्या परिपत्रकामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी सेलिब्रेटी मंडळींशी करार करून आपले बुकिंग वाढवले. मात्र मुंबई पोलिस आयुक्तांच्या नव्या भूमिकेमुळे आपले कोट्यावधीचे नुकसान होत असल्याने हॉटेल व्यावसायिक संघटनेने हायकोर्टात धाव घेतली.
हॉटेल संघटनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, पोलिस आयुक्तांनी अचानक घेतलेला निर्णय आमच्यावर अन्यायकारक व आर्थिक नुकसान करणारा आहे. तसेच हॉटेल व रेस्टांरटला दीडपर्यंत डेडलाईन दिली आहे तर पब आणि फाईव्ह स्टार हॉटेल्सना मात्र तीनपर्यंत डेडलाईन दिली आहे. हा भेदभाव कशासाठी केला जात आहे? का नववर्षाचे सेलिब्रेशन फक्त उच्चवर्गीय लोकांपर्यंत व पब, फाईव्ह स्टारमध्ये जाणा-यांसाठी असते? असे सवाल विचारणारी याचिका वकील विना थंडानींनी हॉटेल व्यावसायिकांच्यावतीने दाखल केली आहे.
तसेच आम्ही सेलिब्रेटी लोकांसमवेत करार केले असून, पार्टीसाठी बुकिंग तिकीटे मोठ्या प्रमाणात विकली आहेत याचा विचार केला जावा. याबाबत उद्या सकाळी मुंबई हायकोर्ट निर्णय देणार आहे.