आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषेतील लेखनासाठीचा सन्मान हे माझे भाग्यच - भालचंद्र नेमाडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठी भाषेने नेहमीच मला जवळ घेतले अाहे. भाषिक राष्ट्रवाद हा नेहमीच महत्त्वाचा मानला जाताे. त्यामुळे या भाषेतील लेखनासाठी माझा सन्मान, सत्कार हाेणे हे मी माझे भाग्य मानताे. ज्ञानपीठ परंपरेचा मी एक भाग झालाे अाहे याचा मला अानंद वाटताे,’ अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. निमित्त हाेते राज्य सरकारकडून झालेल्या त्यांच्या सत्कार साेहळ्याचे.

ज्ञानपीठ मिळाल्याबद्दल नेमाडेंचा गाैरव तसेच मराठी साहित्यातील ज्ञानपीठ विजेत्यांचा स्मरणसाेहळ्याचे गुरुवारी रात्री सांस्कृतिक कार्य संचालनालय अाणि मराठी भाषा विभाग यांच्या वतीने गेटवे अाॅफ इंडिया येथे अायाेजन करण्यात अाले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वेळी नेमाडे यांनी सत्कार स्वीकारला.

या वेळी गेटवे अाॅफ इंडियाच्या भव्य पार्श्वभूमीवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, कविवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांच्याही साहित्यकृतींचे अभिवाचन गायन, नाट्य अादी माध्यमांतून सादर करण्यात अाले. नेमाडे यांच्या ‘काेसला’मधील उतारा, ‘टीकास्वयंवर’मधील समीक्षात्मक लेख, स्त्री संवेदना उलगडवणाऱ्या कविता, कुसुमाग्रज यांच्या ‘वीज म्हणाली धरतीला’ नाटकातील प्रवेश, ‘गर्जा जयजयकार’ हे स्फूर्तिगीत, हासरा लाजरा श्रावण अाला, विंदांची राणीची बाग ही बालकविता, शिवाय त्यांची ‘देणाऱ्याने देत जावे’ यासारख्या कविता या वेळी सादर करण्यात अाल्या. खांडेकर यांच्या ‘उगवुनी निशाण’सारखी कविता वा ‘अमृतवेल’ या कादंबरीतील एक भाग वाचून दाखवत उपस्थित रसिकांना या चारही साहित्यिकांच्या साहित्यविश्वाची सफर घडवली.

तुषार दळवी, वंदना गुप्ते, फय्याज, किशाेर कदम, स्वानंद किरकिरे, रिमा लागू यांसारखे कलाकार, तर पद्मजा फेणाणी-जाेगळेकर, नंदेश उमप, श्रीधर फडके, अाशा खाडिलकर, मुग्धा वैशंपायन यांनी अापल्या गायनातून या साहित्यकृती, काव्यकृती फुलवल्या. प्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाई यांच्या अनाेख्या नेपथ्यरचनेनेही या चारही साहित्यिकांच्या रचनांचा वेध घेतला.

नेमाडेंची ध्वनिचित्रफीत
वादग्रस्त वक्तव्यांसाठी ‘सुपरिचित’ असलेले नेमाडे अाज काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष हाेते. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमास उपस्थित असून त्यांनी या सरकारी कार्यक्रमात बाेलणे टाळले. त्यांच्या भावना ध्वनिचित्रफितीतून उपस्थितांसमाेर मांडण्यात अाल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.