आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Interst Story, Old Couple Dies In 10 Minutes In Mumbai

...आणि दांम्पत्याने घेतला दहा मिनिटांच्या फरकाने अखेरचा श्वास !!!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सत्तरी पार केलेल्या व आतापर्यंतचे वैवाहिक जीवन गुण्या गोविंदाने जगणा-या एका दांम्पत्याचा दहा मिनिटांच्या फरकाने मृत्यू झाल्याची आश्चर्यकारक व हृदयद्रावक घटना नुकतीच उल्हासनगरात घडली आहे. 'तू तिथे मी' असा सच्चा संदेश देत या पती-पत्नीने अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने अखेरचा श्वास घेतला.
याबाबतची माहिती अशी की, उल्हासनगरमधील कॅम्प नंबर चारमधील सुभाष टेकडी येथे तक्षशिला शाळेसमोर गंगाधर शेलार, हारुबाई शेलार हे दांपत्य राहत होते. सत्तरी पार केलेल्या शेलार दाम्पत्यापैकी हारुबाईला अर्धांगवायूने ग्रासले होते. मात्र पती गंगाधर आणि मुलगा केदार यांनी सर्वस्व पणाला लावून हारुबाईला चालण्या-फिरण्यायोग्य केले होते. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी त्या घरात व घराबाहेर फेरफटका मारत असत. मात्र, सहा दिवसापूर्वी गंगाधर शेलार यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे ते बिछान्यावर पडून होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते.
दहा मिनिटात अखेरचा श्‍वास
मात्र, दोन दिवसापूर्वी गंगाधार शेलार यांची प्रकृती आणखी बिघडली. चार दिवस बिछान्यावर काढल्यावर अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे कुटुंबाने एकच अंबोरडा फोडला. त्यामुळे झोपीत असलेल्या हारुबाईला जाग आली. त्यावेळी आपल्या पतीचे निधन झाल्याचे कळताच त्याचा थरकाप उडाला. आपल्यावर ज्याने जीवापाड प्रेम केले, वैवाहिक जीवनात कधीच रागावला नाही, ममतेने जपले, तो जीवन सोबती आज निघून गेला ही बाब हारूबाईला सहन होत नव्हती. त्या मनातच रडत होत्या. त्यांना ओरडता येत नव्हते. मात्र, दु:खाचा घाव वर्मी लागल्याने व तो सहन होत नसल्याने हारूबाईनेही पतीच्या मृत्यूनंतर म्हणजेच दहा मिनिटात अखेरचा श्‍वास घेतला. घरातील सदस्यांना हे काय होतेय काही कळतंच नव्हते. पतीच्या निधनाने धक्का बसल्यानेचक्कर येऊन बेशुद्ध झाल्या असतील असे सर्वप्रथम घरातील लोकांना वाटले. मात्र, हारूबाईंनी प्राण सोडला होता. त्यानंतर सुभाष टेकडी परिसरात पती-पत्नीची एकत्रित निघालेली अंतिम यात्रा बघून संपूर्ण परिसर हळहळून गेला.