आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधीरभाऊ, देवेंद्र तुम्हाला भारीच पडले!, आर.आर.पाटलांचे सत्ताधारी, विरोधकांना चिमटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अल्पमतातल्या भाजप सरकारचा पहिला विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांची निवड, विरोधी पक्षनेत्यांची निवड आणि राज्यपालांचे अभिभाषण असे भरगच्च आणि महत्त्वपूर्ण कामकाज असतानाही विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजवला तो माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांनी. बुधवारी दिवसभरातल्या कामकाजात दोनदा केलेल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री, भाजपचे मंत्री आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या टोप्या उडवत चांगलीच धमाल उडवून दिली. त्यांच्या नर्मविनोदी शैलीतल्या किश्श्यांनी सभागृहात खसखस पिकली होती.

विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यावर बाेलताना आबांनी सत्ताधारी आणि विरोधकांना शाब्दिक चिमटे काढले. भाषणाची सुरुवात करताना आबा म्हणाले, ‘राजकीय विश्लेषकांनाही वेड लागेल, अशा अनिश्चित राजकीय परिस्थितीत आपली निवड झाली त्याबद्दल अध्यक्ष महाराज आपले अभिनंदन. कारण सध्या कोण कोणाचा मित्र आहे हे कळत नाही आणि काही जणांच्या तर विरोधात बसूनही सत्ता सहभागाबाबतच्या वाटाघाटी अजून सुरूच आहेत,’ असा टाेला त्यांनी शिवसेनेला लगावला. भाजपच्या मंत्र्यांना टपल्या लगावताना आबा म्हणाले की, ‘देवेंद्र, तुम्ही भाग्यवान आहात. कारण खडसेंनी प्रादेशिकतेची इतकी मळमळ व्यक्त करूनही मुख्यमंत्रिपदाची माळ तुमच्या गळ्यात पडली.’ तर मुनगंटीवारांकडे पाहून आबा म्हणाले की, ‘सुधीरभाऊ, तुम्ही इतक्या आमदारांचा पाठिंबा मिळवूनही शेवटी देवेंद्र हे गडकरींनाही भारी पडले. तावडेंना खरे तर गृहमंत्री व्हायचे होते. मात्र, त्यांची ती इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी किमान माजी गृहमंत्र्यांचे दालन तरी त्यांना मिळाले,’ असे वाक्य आबांनी उच्चारताच सभागृहात एकच हशा पिकला.

शिवसेनेला टोले
बागडेंना उद्देशून आबा म्हणाले, ‘अध्यक्ष महोदय, आज विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदनाच्या ठरावातले आमचे शब्द मागे घेण्याचा आमचा हक्क कायम ठेवा. कारण शिवसेना पुन्हा सत्तेत सहभागी झाली तर आमचा हा ठराव वाया जाईल,’ त्यांच्या या चौफेर टोलेबाजीला सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांसह पत्रकार आणि प्रेक्षक गॅलरीतूनही चांगलीच दाद मिळत होती.

पाठिंबा नको असणारे सरकार
‘मी अनेक अल्पमतातली अनेक सरकारे आजवर पाहिली आहेत, जी बहुमतासाठी पाठिंबा मागतात; पण हे पहिलेच सरकार मी पाहतोय की ज्यांच्या मागे आम्ही पाठिंबा घेऊन फिरतोय आणि हे घेत नाहीत,’ असा टाेला आबांनी भाजपला लगावला तेव्हा पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडाले.

परतीचे दाेर कापले आहेत
विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या निवडीवरील प्रस्तावावर बोलतानाही आबांनी शिवसेनेला चांगलेच टाेले लगावले. ‘शिवसेनेची अवस्था सध्या बिकट आहे. एकीकडे यांना सत्तेत सहभागी व्हायचे होते. मात्र, ते झाले नाही तर विरोधी पक्षनेतेपद हातून जाऊ द्यायचे नव्हते. पण आता शिंदे, तुम्ही शिवसैनिकांच्या आवेशात भाजपला एकदाचे सांगूनच टाका की, झाले तेवढे पुरे झाले, आता वाटाघाटी नाहीत. परतीचे दोर आम्ही कापले आहेत. आता काही झाले तरी आम्ही पाच वर्षे विरोधी बाकांवरच बसणार आहोत.’

सीएम साहेब, उद्धवना फाेन करा : भुजबळ
‘कालपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तुम्ही घोषणा करत होतात. मग रात्री मुख्यमंत्र्यांचा फोन गेल्यावर असे काय घडले की, आज अचानक तुम्ही माघार घेतली?’ असा टाेला छगन भुजबळांनी शिवसेनेला लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांकडे वळून ते म्हणाले की, ‘सीएम साहेब, विश्वासदर्शक ठरावापूर्वी उद्धवजींना पुन्हा एकदा फोन करा, मग सरकारला बहुमतही सहज मिळेल.’ मात्र, भुजबळांच्या या वाक्यावर शिवसेना आमदार संतप्त झाले आणि त्यांनी गोंधळ सुरू केला. त्यावर पुन्हा या आमदारांकडे पाहत भुजबळ म्हणाले, ‘तुम्हाला केव्हा काय करावे हेच कळत नाही. गेल्या दोन महिन्यांत तर काय करावे याचे अजिबात भान तुम्हाला नव्हते,’ भुजबळांच्या या टोल्याला उपस्थितांनीही दाद दिली.