आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hundred Of Crores Rupees Business Take Into Gujarat From Mumbai Dockyard

मुंबई गोदीतील हजार कोटींचे व्यवहार गुजरातला नेण्याचे कारस्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोदी हा मुंबईचा ऐतिहासिक वारसा असून या शहराच्या आंतरराष्ट्रीय विकासात गोदीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आजमितीला गोदीत हजारो कामगार काम करत असून लाखो लोक यावर अवलंबून आहेत. अशा वेळी नरेंद्र मोदी सरकारकडून मुंबई गोदीतील (मुंबई पोर्ट ट्रस्ट) १ हजार कोटी रुपयांचा व्यवहार गुजरातच्या कांडला बंदरात हलवण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. गुजरातकडे गोदी हलवण्याच्या या कारस्थानामुळे मुंबईतील हजारो लोकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडे स्वतःच्या मालकीची १८०० एकर जागा आहे. ही जागा विकासाच्या नावावर काही देशातील तसेच परदेशातील खासगी उद्योगपतींना बीओटी तत्त्वावर देण्याच्या हालचाली सध्या जोरात सुरू आहेत. उद्योग व्यवहाराच्या जमिनीं शिवाय गोदी म्हणजेच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर लोकवस्तीही आहे. १० हजार झोपड्या तसेच ४ हजार जुन्या चाळीमध्ये लोक राहत आहेत. गोदीशी दररोज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येणारे हजारो लोक आहेत. गोदी रिकामी झाल्यास सेवेत असणारे कामगार तर देशोधडीला लागतील, शिवाय कंत्राटी कामगार, व्यावसायिक व दुकानदारांनाही जगणे अशक्य येईल, असे मलिक म्हणाले. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांनी गोदी हलवण्याच्या हालचालींविषयीची माहिती दिली.

सध्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन म्हणून रवी परमार काम पाहत आहेत. त्यांच्याकडेच गुजरातच्या कांडला बंदराचा कार्यभार आहे. परमार यांच्या माध्यमातून मुंबई बंदरातील १ हजार कोटींचा व्यवहार कांडला बंदरात हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे कितीही मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा विकली जाणार नाही, असे सांगत असले तरी त्यात काही तथ्य नाही. गडकरींनाच अंधारात ठेवून मोदींच्या सूचनेवरून परमार गोदींचे व्यवहार कांडला बंदराकडे नेत आहेत, असेही मलिक यांनी सांगितले.

मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा विकण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध राहणार असून मुंबईची शान असणारी ही गोदी आणि येथील कामगार, रहिवासी, कामगार दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्या बाजूने जोरदार आंदोलन करेल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून राज्यातील अनेक प्रकल्प, योजना गुजरातमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरून पंतप्रधान मोदींवर प्रचंड टीका होत आहे.