आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Egar To Come My First Love To Mumbai Lyric Nadam

पहिले प्रेम असलेल्या मुंबईत परत यायचंय, ब्रिटनमध्‍ये राहणारे संगीतकार नदीमची भावना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कॅसेटकिंग गुलशनकुमार यांची हत्या झाल्यानंतर तब्बल 16 वर्षांपासून लंडन येथे वास्तव्यास असलेल्या संगीतकार नदीम सैफी (नदीम- श्रवण जोडी) याने मुंबईत परत येण्याची इच्छा आहे. ‘दिव्य मराठी नेटवर्क’ने त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्याने आपण दोषमुक्त असल्याचा दावा केला आहे.


1997 मध्ये कॅसेटकिंग गुलशनकुमार यांची अंधेरी येथील एका मंदिराबाहेर दोन व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. यामागे नदीम- श्रवण या एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या संगीतकार जोडीतील नदीम याचा हात असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. तेव्हापासून अटकेच्या भीतीने नदीम लंडन येथे पळाला होता. तपास अधिका-यांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंटही बजावले होते. आरोपी शरण येत नसल्याने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, अलीकडेच लंडन येथील न्यायालय आणि मुंबई पोलिसांनी त्याला या हत्याकांड प्रकरणात दोषमुक्त ठरवले आहे. त्यामुळे त्याच्या मुंबईत येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘माझे पहिले प्रेम असलेल्या मुंबईत परत येण्याची इच्छा आहे,’ असे नदीमने सांगितले आहे.


अशी झाली होती हत्या
12 ऑगस्ट 1997 रोजी गुलशनकुमार अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिरात गेले होते. याचवेळी दोघांनी त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी या हत्येमागे नदीमचा हात असल्याचे स्पष्ट केले. घटनेनंतर पोलिसांनी 19 जणांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने 18 जणांची या प्रकरणातून मुक्तता केली होती.


अत्तराचा व्यावसायिक
लंडनमध्ये गेल्यानंतर आपण अत्तराचा व्यवसाय सुरू केला. सध्या हा व्यवसाय मध्य पूर्व देशात असून लवकरच याचा विस्तार करायचा आहे. माझे पहिले प्रेम हे मुंबई शहर आहे. त्यामुळे मला येथे लवकर परत येण्याची इच्छा आहे. सरकार न्याय देईल अशी अपेक्षा आहे. गुलशनकुमार यांच्या हत्येशी माझा संबंध नसून मी निरपराध आहे. लंडनचे हाऊस ऑफ लॉर्ड्स व मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय माझ्या बाजूने लागला आहे. त्यामुळे मुंबई परत येऊन मला संगीत क्षेत्रात काम करायचे आहे.
नदीम सैफी, संगीतकार