आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी राज्यातच राहणार, दिल्लीला जाण्याचे वृत्त खोडसळ- पृथ्वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मी राज्यातच राहणार आहे. केंद्रात जाण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच याबाबतच्या बातम्या म्हणजे निव्वळ खोडसाळपणा आहे. पत्रकारांनी काय बातम्या कराव्या हा ज्यांचा-त्यांचा प्रश्न आहे, असे सांगत आपण विधानसभेच्या निवडणुकापर्यंत मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट सुनावले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील व्यापा-यांनी पुकारलेल्या बंदबाबत आणि एलबीटीबाबतची माहिती देण्याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी प्राध्यापक, व्यापा-यांचा बंद आणि एलबीटीसह आपल्या दिल्लीवारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मी दिल्लीला इतर कामासाठी गेलो होतो. राज्यातील दुष्काळाचा प्रश्न, रेल्वे व मेट्रो प्रश्न यासह अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी आपण पंतप्रधान मनमोहनसिंग किंवा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटलो नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच आपण तूर्ततरी दिल्लीत जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र याबाबत पत्रकारांकडे काही माहिती असल्यास ती मलाही सांगावी, असे टोला उपस्थित पत्रकारांना हाणला.

केंद्रातील रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि कायदामंत्री अश्विनीकुमार वेगवेगळ्या कारणांनी सध्या अडचणीत आले आहेत. त्यात बन्सल यांची मंत्रिमंडळातून सुट्टी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर, अश्विनीकुमार यांचे खातेबदल करण्यात येणार आहे. सध्या केंद्र सरकारही विविध पातळ्यावर अपयशी ठरले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अडचणीत आले आहे. त्यातच यूपीए- 2 या मनमोहनसिंग यांच्या सरकारला येत्या 22 मे रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. ते साजरा करण्यापूर्वी मनमोहनसिंग आपल्या मंत्रिमंडळात काही फेरबदल करणार आहेत. त्यात पृथ्वीराज चव्हाणांचाही समावेश असल्याच्या बातम्या आज काही ठिकाणी आल्या आहेत. तो धागा पकडत पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर चव्हाणांनी दिल्लीला जाण्याला साफ नकार आहे. मुख्यमंत्री आता राज्यात चांगलेच रूळले आहेत. तसेच ते संयमी, उशीराने पण धाडसी निर्णय घेत आहेत. राज्यात व्यापा-यांना एलबीटीचाच कर भरावा लागेल असे सांगत जकात आता कालबाह्य झाल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी मांडले आहे. प्राध्यापकांनाही मेस्मा लावण्याबाबतच्या पत्रावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी सही करून दणका दिला आहे.

चव्हाण हे स्वच्छ व पारदर्शक कारभारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी राज्याची पुन्हा घडी बसवण्याचे काम सुरु केले आहे. त्यातच त्यांनी आपल्या पक्षाला वरचढ होऊ लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगलाच लगाम घातला आहे. धडाकेबाज काम करणारे व रोखठोक भूमिका मांडणारे अजित पवार यांनाही शांत करण्यात चव्हाण यांना यश आले आहे. हे त्यांचे मोठेच यश असल्याचे बोलले जाते. त्यामुळे केंद्रीय नेतृत्त्वाने चव्हाण यांना 2014 पर्यंत राज्यातून अजिबात न हलविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, केंद्रातील मंत्रिमंडळातील फेरबदल होण्याच्या बातम्या येऊ लागल्या की चव्हाणांचे राज्यातील पक्षातर्गत विरोधक त्यांना दिल्लीकरांचे बोलावणे अशा प्रकारच्या आवया ठोकतात व बातम्या पसरवतात. मात्र, चव्हाण हे 'प्रोफेशनल' राजकारणी असल्याने ते प्रत्येक बाबतीत स्पष्ट भूमिका घेतात. त्यातच चव्हाणांनी राज्यातील बहुतेक सत्ताधारी आमदारांची 'दुकानदारी' बंद केल्याने राष्ट्रवादीच्या आमदारांसह स्वपक्षीय आमदारही नाराज आहेत.