आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Want Result, Raj Thakare Questioned Nashik Corporators

मला रिझल्ट हवाय!,नाशिकच्या नगरसेवकांची राज ठाकरेंकडून झाडाझडती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील एकमेव महापालिका ताब्यात असलेल्या नाशिकमध्ये अपेक्षित विकासकामे होत नसल्याने नाराज असलेले पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी महापौर व नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कामाला लागा, असे फर्मान सोडतानाच मला ‘रिझल्ट हवाय’ असे आदेशच महापौरांना बजावले.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांची आढावा बैठक मंगळवारी मुंबईत घेण्यात आली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘नाशिक पालिकेत सत्ता येऊन दोन वर्षे झाली, या काळात तुम्ही काय केले? तुमच्या अपयशाची उत्तरे लोकांना काय मी द्यायची का?,’ असा सवाल करत राज यांनी सर्व नगरसेवकांना चांगलेच फैलावर घेतले. ‘आपण नवे म्हणून लोकांनी माझ्या विश्वासावर आपल्याला सत्ता दिली आहे. आणि तुम्ही कामे करण्याऐवजी जर कारणे देत असाल तर ते यापुढे चालणार नाही,’ असे सांगत सगळ्या नगरसेवकांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले.
काही नगरसेवकांनी आपण कशी कामे केली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज म्हणाले, ‘जर कामे झाली असे म्हणता तर ती दिसत का नाहीत आणि माध्यमांंमधून त्यांची चर्चा का होत नाही याचे उत्तर मला द्या?’ या प्रश्नावर सारेच नगरसेवक निरुत्तर झाले. या बैठकीत राज ठाकरेंनी महापौर यतीन वाघ व पक्षाच्या नगरसेवकांना चांगलेच सुनावून कामाला लागण्याचे आदेश काढले.
आज पुण्यात हजेरी
या बैठकीनंतर राज ठाकरे हे पुण्याला रवाना झाले असून बुधवारी तेथील नगरसेवकांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
नगरसेवकांच्या चेह-यावर तणाव
नाशिकच्या नगरसेवकांसोबत पाऊण तास चाललेल्या बैठकीमध्ये नगरसेवक आणि राज ठाकरे यांच्याशिवाय कोणीही नव्हते. नाशिकहून एकाच बसमधून आलेल्या या सर्व नगरसेवकांच्या चेह-यावर बैठकीआधी आणि बैठकीनंतरही तणाव स्पष्ट दिसत होता. बैठक संपताच या सगळ्या नगरसेवकांनी बसमध्ये बसून तडक नाशिकच्या दिशेने प्रयाण केले.