आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात भडकला ‘आयएएस’ विरुद्ध ‘आयआरएस’ वाद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारमध्ये प्रमुख पदांवर ‘आयएएस’ ऐवजी ‘आयआरएस’ अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत असल्याने नाराज असलेल्या ‘आयएएस’ लॉबीने याविरोधात दंड थोपटले अाहेत. या नेमणुका राेखण्यासाठी त्यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळे प्रशासकीय सेवेत प्राबल्य असलेल्या अायएएस अधिकारी अायअारएस अधिकाऱ्यांमध्ये अाता राज्यात वाद भडकण्याची चिन्हे अाहेत.

काही आयआरएस अधिकारी मंत्र्यांचे नातेवाईक असल्याचा अाराेपही करत अशा नेमणुकांमुळे आयएएस अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीला अडथळा होऊ शकतो, अशी भीतीही अायएएस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली अाहे. तसेच राष्ट्रपती पंतप्रधानांना पत्र पाठवून याबाबत मार्गदर्शन घेण्यात येईल, असेही पत्रात म्हटले आहे. एका वरिष्ठ आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले, ‘राज्यात सध्या भारतीय महसूल सेवेतील (अायअारएस) सहा अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक गृहमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांचा भाऊ असून मुख्यमंत्री कार्यालय सचिव प्रवीण दराडे यांच्या आयआरएस अधिकारी असलेल्या पत्नीची, पल्लवी दराडे यांची मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाली आहे. खरे तर मंत्रालयात आयएएस अधिकाऱ्यांची संख्या माेठी असून वर्षानुवर्षे मंत्रालयात काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. असे असताना काही ठिकाणी आयएएस अधिकाऱ्यांना डावलून आयआरएसमधील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जात अाहे, हे अयाेग्य अाहे. त्याविराेधात आम्ही दाद मागत आहोत.’ राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव (सेवा) यांना याबाबत आयएएस अधिकाऱ्यांनी पत्र पाठवले असून अशा नेमणुका करू नयेत, अशी मागणी केलेली आहे.

>महसूल सेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला विराेध
> मुख्यमंत्र्यांना पत्र, राष्ट्रपती, पंतप्रधानांनाही घालणार साकडे

ज्येष्ठतेला अडथळ्याची भीती
मंत्रालयाच्याबाहेरील (आयआरएस) अधिकाऱ्यांचा काही अधिकारी मंत्र्यांना हाताशी धरून सचिव उपसचिव पदावर नेमणुका करण्याचा कुटिल डाव आहे. तसेच काही आयआरएस अधिकारी मंत्र्यांचे नातेवाईक असल्यामुळे नेमके कोणत्या हेतूने या नेमणुका हाेत आहेत हा प्रश्न आहे. महत्त्वाच्या पदावर आयआरएस अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या तर ‘आयएएस’च्या सेवाज्येष्ठतेला अडथळा होऊ शकतो. सदर प्रकरण गंभीर असून या प्रकरणात स्वतः लक्ष घालावे. तरीही नेमणुका झाल्या तर आम्ही सर्व आयएएस अधिकारी मिळून सदर बाबतीत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊ, असेही या पत्रात म्हटले आहे.