मुंबई- भारत-पाकिस्तान यांच्यात आठ वर्षानंतर पुन्हा क्रिकेट संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना शिवसेनेने खीळ घातली आहे. सोमवारी सकाळी शेकडो शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमवरील बीसीसीआयच्या मुख्यालयात घुसून थेट शशांक मनोहर यांच्या केबिनमध्ये घुसत 'मुंबईत पाकड्यांसोबत बैठक घ्याल तर याद राखा, गाठ शिवसेनेशी आहे' अशी धमकी दिल्यानंतर मुंबईतील बैठक रद्द करावी लागली आहे. एवढेच नव्हे तर भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चाच आता थांबल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. शिवसेनेच्या या दणक्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)ही सावध झाली आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तान पंच अलीम दार यांना अपांयरिंग करीत आहेत. ते चेन्नई व मुंबईतील सामन्यांतही अपायरिंग करणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अलीम दार यांना आयसीसीने हटविले आहे. दुसरीकडे, मुंबईतील स्टुडिओतून समालोचन करणारे पाकिस्तानचे माजी खेळाडू वसिम अक्रम व शोएब अख्तर यांनीही माघार घेतली आहे. अक्रम व अख्तर हे मुंबईतील सामन्यात समालोचन करणार होते. मात्र, शिवसेना त्यांच्यावरही हल्ला करू शकते या भीतीने त्यांनी माघार घेतली आहे.
पाकिस्तानी गायक गुलाम अली खान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्याविरोधात शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापले होते. त्यातच बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका आयोजित करण्याच्या चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. मनोहर यांनी अत्यंत गुप्तपणे या हालचाली केल्या; पण शिवसैनिकांना याची खबर लागली होती. शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी कसुरी यांच्याविरोधात केलेल्या आंदोलनावेळीच मुंबईत पुढील आठवड्यात एक पाकिस्तानशी संबंधित कार्यक्रम होणार आहे व त्यावेळी योग्य धडा शिकवू असा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. मात्र, भोसलेंच्या वक्तव्याकडे मुंबई पोलिस व सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. बीसीसीआयने या पार्श्वभूमीवर पुरेशी सुरक्षा मागवली नाही. परिणामी शिवसेनेने गनिमी काव्याने बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून थेट मनोहर यांनाच लक्ष्य केले. अखेर बैठक रद्द करावी लागली.
भारत-पाक क्रिकेट संबधांना पुन्हा खीळ-
26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात द्विपक्षीय मालिकेसाठी आला नाही. दोन्ही देशांमध्ये गेल्या आठ वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठलीही मालिका झालेली नाही. 2012 मध्ये पाकिस्तानचा संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता; पण त्यावेळी शिवसेनेच्या विरोधामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पाकिस्तानी संघाने पाऊलही ठेवले नव्हते. ही मालिका पाकिस्तानने जिंकली होती. आता पुन्हा एकदा या दोन देशादरम्यान क्रिकेट संबंध प्रस्थापित करण्याबाबत दोन्ही बाजूंकडून प्रयत्न सुरु होते. मात्र, शिवसेनेच्या दणक्याने शहरयार खान यांची मुंबईतील बैठक रद्द झाली. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मुंबईतील बैठक दिल्लीतील होईल असे जाहीर केले. मात्र, एकून परिस्थिती पाहता बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील बैठकही रद्द केल्याचे जाहीर केले. इतकेच नव्हे तर, नजीकच्या काळात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डासोबत अशी कोणतीही बैठक देशात कुठेही होणार नाही असे त्यांनी सांगून टाकले. उभय देशांमध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत की नाहीत यासंदर्भात केंद्र सरकारच निर्णय घेईल, असेही सांगून बीसीसीआयने वाद वाढणार नाही याची काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दोन देशादरम्यान पुन्हा क्रिकेट संबंध सुरळित होण्यास काही काळ खीळ बसल्याचे मानले जात आहे.
पुढे वाचा, ...तर पाकिस्तान संघ पुढील वर्षी भारतात होणा-या T-20 वर्ल्डकपवर बहिष्कार टाकेल- अब्बास