आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचांना मानधन वाढीसह ओळखपत्र; ग्रामविकासमंत्र्यांचे सरपंच दरबारात आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सरपंचाच्या मानधनात वाढ करण्यात येईल तसेच सर्व सरपंचांना सरकार ओळखपत्र देईल, असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. गुरुवारी मंत्रालयात पहिल्या सरपंच दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यात १०० पेक्षा जास्त सरपंच सहभागी झाले. 


या वेळी मुंडे म्हणाल्या, राज्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना अपूर्ण आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. राज्यातील पहिल्यांदा निवडून आलेल्या तरुण सरपंचांची संख्या मोठी आहे. त्यांना गावांच्या विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सरपंचासाठी आपण वेळ राखून ठेवणार आहोत. ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढवण्यासाठी बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या योजनेंतर्गत गावात ग्रामसचिवालये बांधण्यात येणार आहेत. ज्यामध्ये गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्या कार्यालयासह इतर कार्यालये एकत्रित येणार आहेत. सरपंचांनी गावाच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, गावे हागणदारीमुक्त, सांडपाणीमुक्त आणि पाणंदमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सरपंचांनी नियोजनपूर्वक कामे केली तर गावांचा पर्यायाने ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत होईल, असे मुंडे या वेळी म्हणाल्या.   


तरुण सरपंचावर भिस्त  
हल्लीचे सरपंच पदव्युत्तर पदवीधारक, अभियंतेसुद्धा आहेत. तरुण सरपंचांची संख्या वाढत आहे. या सरपंचांनी राज्य सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा. त्यांची गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच सरपंचांच्या संपर्कात राहण्यासाठी आपण सरपंच दरबार आणि सोशल मीडियाचा प्लॅटफाॅर्म अधिक जोरकसपणे वापरणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...