आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Challenge Me, Then I Will Become Chief Minister Of Maharashtra, Say Uddhav Thackeray

आव्हान देत असाल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवूनच दाखवतो, उद्धव ठाकरे यांची गर्जना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सोन्याचं ताट समोर असताना दोन-पाच जागांसाठी युती तोडली, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नाव न घेता भाजपवर केला. मी कधी खुर्चीचा वेडापिसा नव्हतो, मात्र जर कुणी आव्हान देत असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊनच दाखवेन, अशी गर्जनाही त्यांनी केली. शिवसेना-भाजप युतीचा काडीमोड झाल्यानंतर मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित पहिल्याच प्रचारसभेत उद्धव बोलत होते.

भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले, युती तुटल्याने शिवेसना एकाकी पडल्याचे बोलले जात आहे. मी म्हणतो आता होऊनच जाऊ द्या. लाट कशाला म्हणतात ते शिवसैनिक दाखवून देतीलच. युतीबाबत मला इच्छा नसताना बोलावे लागत आहे. २५ वर्षे खूप सहन केले. खूप साचले होते. युती तुटली हे दुर्दैव नाही तर सुदैव आहे. २५ वर्षांचे नाते भाजपने तोडले. रंगशारदाच्या भाषणापर्यंत युती तुटली नव्हती. चर्चा सुरू होती. मी शेवटपर्यंत चर्चेला तयार होतो परंतु त्यांनी सुरुवातीलाच ठरवून टाकले होते की युती तोडायची आणि त्यांनी ती तोडली. युती तुटल्याचा मला आनंद झालेला नाही. मी युती तोडली नाही. ३०-३५ जागा सेडणे शक्य नव्हते. राजकीयदृष्ट्या त्यांनी युती तोडली, हिंदुत्वाचेही नाते तोडले तर जनता त्यांना माफ करणार नाही असेही ते म्हणाले.

भाजपला सर्व जागा देण्यास तयार.... : शिवसेना भाजपला सगळ्या जागा देण्यास तयार आहे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, मात्र त्याअगोदर पाकिस्तान आणि चीनच्या ताब्यातील जागा घेऊन या. कर्नाटकमध्ये असलेला महाराष्ट्राचा भूभाग परत आणा. जागेची काय किंमत असते हे काश्मिरी पंडितांना विचारून पाहा. तुम्ही युती तोडलीत, सगळा महाराष्ट्र हळहळतोय, सत्ता येणार असताना असे घडले. तुम्ही कर्मदरिद्री आहात, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
शरद पवार मंगळावरही जाऊ शकतात : गायरान जमिनीही स्वतःच्या नावावर करणारे शरद पवार मंगळापर्यंतही जाऊ शकतात. नासाने एक फोटो प्रकाशित केला, परंतु दुसरा केला नाही. कारण तो फोटो तेथे असलेल्या एका फलकाचा होता आणि त्यावर ही जागा शरद पवार यांची आहे असे लिहिलेले होते. मुख्यमंत्री चव्हाण म्हणतात मला अनुभव नाही. खरेच मला भ्रष्टाचाराचा अनुभव नाही आणि मी तसाच राहणार आहे. आता कमी वेळ असल्याने मी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर टीका करण्यात वेळ घालवणार नाही.

मग कुठूनही निवडणूक लढवेन : मला मुख्यमंत्रिपदाची हौस नाही हे मी अगोदरही म्हटलेले आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच येणार आणि आमचे मंत्रिमंडळही तयार आहे असे उद्गार काढत उद्धव ठाकरे म्हणाले, मी निवडणूक लढवत नाही असे म्हटले जात आहे. आम्हाला एकहाती सत्ता द्या, मग मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना सांगेन की तुम्ही जेथून सांगाल तेथून मी निवडणूक लढवेन आणि मोठ्या मतांनी निवडून येईन.

उपमुख्यमंत्रिपदाची आठवलेंना ऑफर
बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशक्ती-भीमशक्तीचे स्वप्न साकार करण्यासाठी आठवलेंनी सोबत घ्यावे, असे म्हणत उद्धव यांनी आठवलेंना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफरही दिली. तसेच सत्तेत चांगला वाट देण्याचेही आश्वासन दिले.

पंकजा, प्रीतमविरुद्ध उमेदवार नाही
उद्धव म्हणाले की, युती तुटल्याचा आनंद झालेला नाही. एकमेकांच्या सोबतीने केलेले २५ वर्षांतील सर्व संघर्ष डोळ्यासमोर येतात. गोपीनाथ मुंडेंचीही आठवण येते. मात्र आता भाजपमध्ये त्या पातळीचा नेता शिल्लक राहिलेला नाही. तथापि, महाजन व मुंडे कुटुंबांसोबतचे संबंध कायम राहतील. शिवसेना पंकजा व प्रीतम यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचे उद्धव यांनी सांगितले.

शाह्यांचे काय झाले?
उद्धव म्हणाले, शिवाजी महाराजांना संपवायला कुतुबशाह, निजामशाह, आदिलशाह आले. परंतु त्यांचे काय झाले ते सगळ्यांना ठाऊक आहे. (गर्दीतून अमित शहा यांचे नाव पुकारण्यात आले) उगाचच घाई करू नका. माझ्या तोंडून नको ते नाव येईल असे म्हणत त्यांनी अमित शहा यांचे नाव टाळले. मोदी लाट होती तर गुजरात, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये भाजप का हरली?