आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If No Crime, Why Ran Away? Session Court Questioned On Salman Behavior

गुन्हा नव्हता, मग पळाले का? सलमानच्या वागण्यावर न्यायालयाचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जर तुम्ही काहीच चुकीचे केले नाही, तर अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन का केले? पाेलिस येईपर्यंत तिथेच का थांबला नाहीत? सकाळी साडेदहापर्यंत घरातच बसून का राहिलात?’ अशा शब्दांत मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी अापल्या २४० पानी निकालपत्रात हिट अँड रन प्रकरणातील अाराेपी सलमान खानच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले.

मुंबईत २८ सप्टेंबर २००२ राेजी झालेल्या अपघातात सलमान खानच्या गाडीखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला हाेता, तर चाैघे गंभीर जखमी झाले हाेते. १३ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात न्यायालयाने बुधवारी सलमानला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठाेठावली अाहे.
माध्यमातील एका रिपाेर्टनुसार, ‘जर सलमानच्या हातून अपघात झाला नव्हता, तर घटनेनंतर त्याने तातडीने पाेलिसांना याबाबत माहिती द्यायला हवी हाेती. मात्र, त्याने ना पाेलिसांकडे घटनेची माहिती दिली ना रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. याच बाबी सलमानला अाराेपी सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.’
सलमानच्या बचावाचे प्रयत्न निष्फळ
१. टायर फुटले नव्हते : अपघाताच्या वेळी सलमानच्या लँड क्रुझर गाडीचे टायर फुटल्याचा बचाव पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. अपघातस्थळावरील बेकरीच्या पायऱ्यांवर गाडी चढल्याने चाकातील हवा गेली असावी, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला. तज्ज्ञांनीही टायर पंक्चर नसल्याचे सांगत त्यातील फक्त हवा गेल्याचे स्पष्ट केले. त्यावरून ‘जर टायर फुटले असते तर बेकरीच्या दाेन-तीन पायऱ्यांवर गाडी गेलीच नसती,’ असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.
२. पाटील नि:पक्ष साक्षीदार : सलमानचे अंगरक्षक, दिवंगत पाेलिस काॅन्स्टेबल रवींद्र पाटील यांची साक्ष न्यायालयाने नि:पक्ष मानली. त्यांच्या साक्षीच्या अाधारेच सलमानला दाेषी मानण्यात अाले. अपघाताच्या वेळी पाटीलही सलमानच्या गाडीत हाेते. २००७ मध्ये टीबीमुळे पाटील यांचा मृत्यू झाला.

जामिनावर आज सुनावणी
सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर सलमानने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. निकालाची प्रत न मिळाल्याने दोन दिवसांचा तात्पुरता जामीन दिला होता. गुरुवारी त्याच्या वकिलांनी निकालाची प्रत सादर केली असून शुक्रवारी उच्च न्यायालय जामिनावर निर्णय घेईल.