आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If No Work Is Not Debt Relief; Opposition Leader Stand Firm

कर्जमाफी नाही तर कामकाजही नाही; विराेधक भूमिकेवर ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पावसाने मोठी ओढ दिल्याने खरिपातली पेरणी वाया गेलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी विधान परिषदेत मंगळवारी सलग दुसऱ्याही अभूतपूर्व गोंधळ घालत कामकाज रोखून धरले. तसेच ‘कर्जमाफी नाही तर कामकाजही नाही,’ असा खणखणीत इशारा फडणवीस सरकारला दिला.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज पत्रिकेत प्रश्नोत्तरे, अध्यादेश पटलावर ठेवणे, पुरवणी मागण्या, लक्षवेधी सूचना, शासकीय विधेयके, अर्धा तास चर्चा असे भरगच्च कार्यक्रम होेते. दुपारी बारा वाजता सभागृह सुरू झाले. प्रश्नोत्तरांचा तास पुकारण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात २८९ च्या प्रस्तावावर चर्चेची विरोधकांनी मागणी केली. राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांनी कर्जमाफीचा िवषय कसा २८९ चा प्रस्ताव होऊ शकतो यासंदर्भात ठामपणे बाजू मांडली. त्यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारची बाजू मांडली.

...नाही तर खुर्च्या खाली करा
तहकुबीनंतर तालिका सभापती जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू झाले; परंतु विरोधक काही एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कागद फाडून तुकडे फेकले जात होते. सभापतींचा टेबल बडवला जात होता. ‘तातडीने कर्जमाफी करा, नाही तर खुर्च्या खाली करा,’ असे बॅनर फडकवले जात होते. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे ४० आणि १५ मिनिटांसाठी दोन वेळा चांदूरकर यांनी सभागृह तहकूब केले.
राज्यच कर्जबाजारी, माफी देणार कशी? : खडसे
राज्यावर ३ लाख ८५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.निव्वळ व्याज भरण्यासाठी वर्षाला २४ हजार कोटी रुपये खर्ची पडत आहेत. त्यामुळे कर्जमाफी शक्य नसल्याचे खडसे यांनी सांगितले. मात्र, आधी कर्जमाफीचे बोला, असे म्हणत विरोधी सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. तसेच खडसे यांच्या भाषणात व्यत्यय आणला. वाढता गोंधळ पाहून सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
खडसेंची एकाकी झुंज, शिवसेना आमदारांचे माैन
सरकारवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य तुटून पडले होते. महसूलमंत्री आणि सभागृह नेते एकनाथ खडसे विरोधकांना एकटे तोंड देत होते. अशा वेळी सरकारमधील सहभागी शिवसेनेचे मंत्री आणि इतर सर्व सदस्य मात्र हा गोंधळ शांतपणे पाहत बसून होते. विरोधकांच्या आक्रमक धोरणामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा परिषदेत कागदपत्रे पटलावर ठेवण्याव्यतिरिक्त काहीही कामकाज होऊ शकले नाही.
प्रस्ताव फेटाळला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे धनंजय मुडे आणि काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांनी २८९ चा प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव सभापती रामराजे नाईक-िनंबाळकर यांनी मंगळवारी फेटाळून लावल्याचे जाहीर केले.