आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Raj Thackeray\'s Speech Found Guilty, We Will Take Action Againest Him Cm Chavan

राज ठाकरेंच्या भाषणाची CD मागवली, दोषी आढळल्यास कारवाई करू -मुख्यमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘तुमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आणणार्‍यांना आधी मारा, मगच मरा,’ असा विचित्र सल्ला विदर्भातील शेतकर्‍यांना देणा-या राज ठाकरेंवर सरकारची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेतील भाषणाची सीडी राज्य सरकारने मागवली असून, त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करू असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
चव्हाण यांनी यावेळी भाजपसह शिवसेना व मनसेवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, राज ठाकरेंचे हे वक्तव्य विचित्र व चुकीचे आहे. मनसेकडे कोणतेही ध्येयधोरण व मुददे नाहीत. त्यामुळे नेते काहीही भाष्य करीत आहेत. एकीकडे भाजपशी अंतर्गत छुपी युती करायची व दुसरीकडे शिवसेनेला विरोध करायचा, अशी मनसेची निती आहे. भाजप व मनसेत छुपी युती असल्याचे माहित असतानाही शिवसेना आणखी किती अपमानित होणार. मनसेने मध्यंतरी घेतलेला टोलचा मुद्दा का गायब केला ते त्यांनाच माहित असा टोलाही राज ठाकरेंना चव्हाण यांनी हाणला.
राज्यात काँग्रेसला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करताना चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी या निवडणुकीला एकदिलाने व एकोप्याने समोरे जात आहे. काही मतदारसंघात नेत्यांत वाद आहेत व ते असतात पण ते वादही सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेसची विकासाबाबतची व आर्थिक धोरणे सर्वांना पुढे घेऊन जाणारी असल्याने भाजपला आमचा जाहीरनामा कॉपी पेस्ट करावा लागल्याची टीका त्यांनी केली. मात्र, केवळ विकासाच्या मुद्यांवर आपण निवडून येऊ शकत नाही याची जाणीव होताच भाजपने पुन्हा हिंदुत्त्वाला हात घातला असल्याची टीका चव्हाण यांनी केली.