आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Someone Speak Truth Its Mean He Thief Pankaja Munde

कोणी खरे बोलले की चोर; बाकी साधू आहेत का? पंकजा मुंडे यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - निवडणुकीतील खर्चाच्या विधानामुळे अडचणीत सापडलेले भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व आमदार पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केल्याने वादात आणखी भर पडली आहे. मुंडेंच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले असून सर्वच पक्ष कोट्यवधींची उधळण करतात हे जनतेला माहित नाही का, असा सवाल करत या पेजवर ‘कोणी खरे बोलले की चोर आणि बाकी साधू आहेत का’, असा सवाल पंकजा यांनी केला आहे. ‘पंकजा मुंडे पालवे’ या नावाने असलेले पेज खोटे असून त्याचा पंकजा यांच्याशी संबंध नसल्याचा खुलासा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.


अधिकृत ‘ओनर’ कोण : पेजवरील मजकुराबाबत भाजपमधून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही. पंकजा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता. त्यांच्या निकटवर्तीयांनी मात्र पेज खोटे असल्याचे म्हटले आहे. पंकजा यांनी हा मजकूर टाकला नसल्याचा खुलासा करण्यात आला असला तरी संपूर्ण पेज काही एका रात्रीत सुरू केलेले नाही हे उघडच आहे.


असे आहे फेसबुक पेज : या पोस्टला 74 लोकांनी ‘लाइक’ केले असून 24 जणांच्या ‘कॉमेंट्स’ आहेत. ‘फ्रेंड्स’च्या यादीत ओमप्रकाश चौहान हे मुंबई भाजपचे पदाधिकारी, तर ‘लाइक’मध्ये भाजप बारामती या नावाचा समावेश आहे. स्वत: पंकजा मुंडे पालवे यांनीही प्रतिक्रिया ‘लाइक’ केलेली आहे. पेजवर पंकजा, गोपीनाथ मुंडे व परिवाराचे खासगी फोटो आहेत. तसेच पंकजा यांच्या विविध राजकीय कार्यक्रमांचे, दौ-यांचे फोटो आहेत.


पेजवरील मजकूर असा
‘मुंडे साहेबांच्या तोंडून निवडणुकीतल्या आठ कोटी खर्चाचा उल्लेख काय झाला अन् इतर सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्याविरुद्ध टाहो फोडला. जणू काही असे खर्च त्यांनी कधी पाहिलेच नाहीत. सर्व ‘नाटकं!’ सर्वच पक्ष निवडणुकीत करोडोंची उधळण करतात हे जनतेला माहीत नाही काय? कोणी खरे बोलले की चोर आणि बाकी साधू आहेत का.. साध्या ग्रामपंचायत निवडणुकीत लाखाची उधळण करतात आणि या वेळी तर त्याचा आकडा राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे आकाशाला भिडला आहे, कारण करोडोंचे घोटाळे करून कमावलेली माया कुठे वापरतात.. मुंडे साहेबांवर जे आरोप होत आहेत ते केवळ आपण किती साधू आहोत हे जनतेला दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे राष्ट्रवादीचा. पण जनता डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलेली’.