आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकारने पॅकेज दिल्यास महागाईत वाढ: आरबीआय; कर्जमाफीने तुट 1 टक्के वाढेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक पॅकेजसंदर्भात सरकारला इशारा दिला आहे. यामुळे राजकोशीय तूट वाढणार आहेच; पण त्याचबरोबर महागाई वाढून अनेक दिवसांपर्यंत अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याचे संकेत दिले आहेत. बुधवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जारी केले असून यामध्ये असे मत व्यक्त केले आहे. जीडीपी विकास दर वाढवण्यासाठी सरकार ५०,००० कोटी रुपयांचे पॅकेज देणार असल्याची चर्चा आहे.  

आर्थिक पॅकेज आणि शेतकरी कर्जमाफीमुळे २०१७-१८ मध्ये राजकोशीय तूट एक टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी मांडले आहे. यावर्षी अर्थसंकल्पात ३.२ टक्के तुटीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तूट एक टक्क्याने वाढल्यास महागाई दर ०.५ टक्के वाढण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. केंद्र आणि राज्य दोघांचीही तूट जीडीपीच्या सहा टक्क्यांच्याही वर जाईल. विशेष म्हणजे एप्रिल ते ऑगस्टदरम्यानच्या पाच महिन्यांतील तूट वार्षिक उद्दिष्टाच्या ९६.१ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.  
 
एप्रिल-जूनमध्ये औद्योगिक जीव्हीए विकास तिमाही आणि वार्षिक दोन्ही आधारांवर कमी झाला असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. उत्पादन क्षेत्रातील जीव्हीए केवळ १.२ टक्क्यांनी वाढला आहे, जो गेल्या २० तिमाहींतील सर्वात कमी आहे. खाण उद्योगात गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत सुधारणा दिसून आली होती. मात्र, यावर्षी पहिल्या तिमाहीत यात पुन्हा घसरण झाली आहे. खासगी मागणी आणि कॅपिटल फॉर्मेशनची गती अत्यंत कमी आहे. तरीदेखील ट्रेड, हॉटेल, वाहतूक आणि दूरसंचारमध्ये आलेल्या सुधारणेमुळे सेवा क्षेत्रातील आकडेवारी सुधारली आहे.

स्वस्त कर्जामुळे मदत मिळते : उद्योग जगत 
रेपो दर कमी करण्यात आला नसल्याने उद्योग जगताने नाराजी व्यक्त केली आहे. कर्ज स्वस्त झाल्यास मागणी आणि विकास दर वाढण्यास मदत मिळत असल्याचे उद्योगांनी म्हटले आहे. विकासाच्या दृष्टीने परिस्थिती अनुकूल नसल्याचे फिक्कीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी म्हटले आहे. पहिल्या तिमाहीतील जीडीपी आणि गुंतवणुकीची आकडेवारी पाहिल्यास हे लक्षात येते, तर सध्या महागाई नियंत्रणात असल्याने रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करायला हवे होते, असे असोचेमचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत दर कपातीची अपेक्षा नव्हती तरी दर कपात झाली असती तर रिअल्टी क्षेत्रात मागणी वाढली असती, असे मत रिअल्टी कन्सल्टन्सी संस्था नाइट फ्रेंक इंडियाचे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी व्यक्त केले आहे. 

बँकिंग, रिअल्टी, वाहन क्षेत्रात तेजी 
पतधोरणाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली. बँकिंग, रिअल्टी आणि वाहन या व्याजदराशी जोडलेल्या क्षेत्रातील शेअरमध्ये ४.२ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स १७४.३३ अंक म्हणजेच ०.५५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. बँकांत कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरमध्ये २.१६ टक्के, रिअॅल्टी शेअरमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये ४.२२ टक्के आणि वाहन क्षेत्रातील महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअरमध्ये १.८९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...