आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If You Want To Security Of Woman Resposibility On Ganesh Mandal

‘महिलांची सुरक्षा जर गणेशोत्सव मंडळांवरच टाकायची असेल तर पोलिस खाते कशाला हवे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी जर गणेशोत्सव मंडळांवरच टाकायची असेल तर पोलिस खाते कशाला हवे? असा निर्णय घेणारे मुंबई पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांचेच गणेशोत्सवाच्या आधी विसर्जन करायला हवे,’ अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.


भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनाला येणा-या महिलांच्या विनयभंगाच्या घटना दरवर्षी वाढत आहेत. त्याबाबत मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने समाजकंटक व स्त्रीलंपट मंडळींना वेसण घालण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी गणपतीच्या दर्शनासाठी येणा-या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित मंडळांवर टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यासंदर्भात कुचराई झाल्यास संबंधित मंडळाची मान्यता रद्द करण्याचे कठोर पाऊल उचलण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. सिंह यांचा हा निर्णय वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यावर शिवसेनेने आयुक्तांना लक्ष्य केले.
जबाबदारी शिवसैनिक घेतील
शक्ती मिलमध्ये झालेली बलात्काराची घटना हा पोलिस आयुक्तांच्या वर्दीस लागलेला कलंक असतानादेखील ते अद्याप खुर्चीला चिकटून बसले आहेत आणि गणेश मंडळांवर दबाव टाकून महिलांच्या सुरक्षेबाबत स्वत: नामानिराळे राहत आहेत. पोलिसांना जमत नसेल तर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी शिवसैनिक घेतील, परंतु श्रीगणेश मात्र या ‘असत्यपालां’चे विसर्जन केल्याशिवाय राहणार नाही.
फतवा मूर्खपणाचा, तुघलकी
उद्धव ठाकरे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात एखाद्या मंडळाच्या हद्दीत महिलेशी गैरवर्तणूक झाली तर त्याकरिता गणेशोत्सव मंडळाला जबाबदार धरून त्या मंडळाची मान्यता रद्द करण्याचा पोलिसांचा निर्णय तुघलकी थाटाचा आहे. सत्यपाल सिंह यांचा फतवा मूर्खपणाचा व अरेरावीचा आहे. ब्रिटिश काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हादेखील असे फतवे निघाले नव्हते, परंतु केवळ नावाचेच सत्यपाल असणा-या पोलिस आयुक्तांनी स्वत:च्या जबाबदारीचा ढेकूण झटकून तो गणेश मंडळांवर टाकला आहे.
काय म्हणाले सत्यपाल ?
गणेशोत्सव काळात दर्शनासाठी येणा-या महिलांशी कसलेही गैरवर्तन झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित गणेश मंडळाची असेल. कोणत्याही मंडळाने ही जबाबदारी पार पाडण्यात हलगर्जीपणा दाखवल्यास भविष्यात त्यांना गणपती बसवण्यास परवानगी दिली जाणार नाही. गणपती दर्शनासाठी येणा-या महिलांची छेडछाड होऊ नये, चेन स्नॅचिंगचे प्रकार होऊ नयेत म्हणूनही मंडळांनी जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी.