आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणिताच्या शिक्षकांची आयआयटी घेणार शाळा,36000 शिक्षकांना तज्ज्ञ देणार प्रशिक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान विषयातील गुणांची घसरण थोपवण्यासाठी 9 वी आणि 10 वी इयत्तांना शिकवणा-या 36 हजार शिक्षकांना मुंबई ‘आयआयटी’चे तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. आयसीएसई आणि सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश देण्याचे प्रमाण राज्यात वाढले आहे. परिणामी राज्य शिक्षण मंडळ अभ्यासक्रमाच्या शाळा ओस पडू लागल्या.
इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या परीक्षेत विज्ञान आणि गणित विषयांतील विद्यार्थ्यांच्या गुणांची घसरणही सध्या झपाट्याने होत आहे. याची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांचा या विषयांतील टक्का वाढवण्यासाठी आयआयटीची मदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई आयआयटीमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. माधुरी सावंत यांची राज्यांच्या शिक्षण सल्लागार म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पाला आयआयटी विशेषज्ञ आणि राज्य शासनाचे शंभर टक्के आर्थिक पाठबळ लाभले आहे. त्यासाठी राज्यात 100 रिमोट सेंटर उभारण्यात येतील. मुंबईतील स्टुडिओतूत रिमोट सेंटरमधील 2 हजार शिक्षकांना एकाच वेळी आयआयटी तज्ज्ञ विज्ञान आणि गणित कसे शिकवावे याचे धडे देतील.
9 वी आणि 10 वी या इयत्तांना शिकवणारे राज्यात 36 हजार शिक्षक आहेत. त्या सर्वांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास 8 वी, 11 वी आणि 12 या इयत्तांना शिकवणा-या शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्याबाबतचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. शालेय स्तरावर गणित हा कठीण वाटणारा विषय शिकवण्याची आयआयटी तज्ज्ञांची खास अशी पद्धत आहे. त्यात जनसांख्यिकीय आणि दृश्यतेचा वापर अधिक असतो.
आयआयटीच्या या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या विज्ञान आणि गणित विषय शिकवण्याच्या कौशल्यात वाढ होईल.
असे असेल प्रशिक्षण मुंबई आयआयटीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधुरी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येईल. या प्रशिक्षणात अ‍ॅनिमेशन, ग्राफिक डिझाइन याचा वापर अधिक असेल. या प्रशिक्षणासाठी ‘ए-व्ह्युव’ नावाचे स्वॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसांचा असून प्रत्येक शनिवारी 100 रिमोट सेंटरवर त्याचे आयोजन केले जाईल.
कोण आहेत सावंत ?
मुंबई आयआयटीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधुरी सावंत यांनी पंढरपूर तालुक्यात आकाश टॅब्लेटचा प्रकल्प राबवला आहे. यापूर्वी त्यांनी 250 शिक्षकांना प्र्रशिक्षित करण्याचा प्रकल्प पार पाडला आहे. त्या प्रकल्पाचे यश पाहून त्यांची राज्याच्या शिक्षण सल्लागार म्हणून शासनाने नेमणूक केल्याचे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव प्रकाश ठुबे यांनी सांगितले.