आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीयन्सची मधुमेह जनजागृती, रविवारी २०० शिबिरांतून शुगरची होणार मोफत चाचणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई आयआयटीचे विद्यार्थी आता पुढे सरसावले असून एकाच दिवशी मधुमेहासंदर्भातील चाचण्यांचा जागतिक विक्रम देशात रविवारी होणार आहे. त्यासाठी देशातील मेट्रो शहरात आयआयटीचे विद्यार्थी दोनशे कॅम्प लावणार असून या विक्रमांची नोंद गिनीज बुकमध्ये होण्याची शक्यता आहे.

मधुमेह हा जीवनशैलीजन्य आजार आहे, तसेच भारत या आजाराची राजधानी बनत आहे. भारतीय व्यक्ती मधुमेहाबाबत हवा तितका जागृत नाही. त्यामुळे या आजारांबाबत प्रबोधन करण्यासाठी पवई आयआयटीचे विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. रविवारी (दि. २५) देशातील मोठ्या शहरांमध्ये २०० शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. येथे आलेल्या व्यक्तीच्या रक्ताची मोफत चाचणी करण्यात येईल. तसेच ज्यांच्या रक्तात शुगर आढळून येईल, अशा व्यक्तींना मधुमेह आजाराबाबत सल्ला देण्यासाठी डाॅक्टर्सही उपस्थित असणार आहेत. २०० पैकी मुंबईत १०० शिबिरे असतील, बाकी चंदिगड, नोएडा, बंगळुरू, दिल्ली, जयपूर, इंदूर, गुडगाव अशा मोठ्या शहरांत असणार आहेत. अजमेर दर्गा आणि पुष्कर मंदिर येथेही या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन्स, माॅल्स आणि राष्ट्रीय उद्याने अशा ठिकाणी या शिबिरांच्या जागा निवडण्यात आल्या आहेत.
चाचणी करणाऱ्यांना सिमकार्ड
पवई आयआयटी दरवर्षी आंतरराष्ट्रीय टेकफेस्टचे आयोजन करते. हा टेकफेस्ट विज्ञानाची जत्राच असतो. जगातील अडीच हजारपेक्षा अधिक विज्ञान संस्था आणि महाविद्यालये यामध्ये भाग घेत असतात, तसेच दीड लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी टेकफेस्टला भेट देत असतात. टेकफेस्ट आयोजक विद्यार्थ्यांनीच मधुमेह आजाराच्या जागृतीबाबत पुढाकार घेतला आहे. पवई आयआयटी कॅम्पमध्ये मधुमेह चाचणी करणाऱ्यांना रिलायन्स जिओ सिमकार्ड मोफत दिले जाणार असल्याची माहिती आयोजक विद्यार्थी करण मेहता याने दिली.
बातम्या आणखी आहेत...