आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदा C सैर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : फेस्टमध्ये सर्वांना प्रवेश विनामूल्य
देशभर मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाविषयी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारमण, टाटा मोटर्सचे रविकांत, अॅक्सिस बँकेचे यदुवेंद्र माथुर, डाॅ. वेलुमणी आणि डाॅ. दीपक फाटक मते मांडतील.
- १६ ते १८ डिसेंबर दरम्यान मुंबईत रंगणार टेकफेस्ट
आशिया खंडातील सर्वात मोठा तंत्रज्ञानाचा उत्सव म्हणजे आयआयटी मुंबईचा ‘टेकफेस्ट’ पवई येथील कॅम्पसमध्ये १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी ‘अ स्पेस एक्स्पीडिशन’ अशी थीम यंदाच्या टेकफेस्टची ठेवण्यात आली असून भारताचे आजपर्यंतचे सर्व उपग्रह येथे पाहता येतील.
तसेच भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याशी संवाद साधण्याची संधी यंदाच्या टेकफेस्टचे खास आकर्षण आहे. मनाने नियंत्रित करता येणारे ड्रोन, पक्ष्यांच्या हालचाली टिपणारे ड्रोन, इस्रो संस्थेने अंतराळत सोडलेल्या आजपर्यंतच्या सर्व उपग्रहांच्या प्रतिकृती, पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फाॅर्म्युला वन रेसिंग कार आणि पाण्याखाली चालणारे वाहन अशा भन्नाट गोष्टी विज्ञान प्रदर्शनात पाहण्यास मिळणार आहेत.
तसेच ज्याच्या वापराने मनुष्य ताशी ११ किमी अंतर चालू शकतो, ते फ्रान्सचे ‘रोलकेर्स’ हे छोटेखानी वहनयंत्र येथे तुम्हाला हाताळता येईल. युवकांच्या सर्वाधिक पसंतीची ‘रोबो वाॅर’ स्पर्धा यंदाही आयोजित केली आहे. इजिप्त, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील युवकांचे रोबो या स्पर्धेत असतील. आयआयटीचा कॅमपस ५०३ एकरांचा आहे.
टेकफेस्टमध्ये कोठे काय पाहायचे, आपण आता कोठे आहोत याची अचूक माहिती देणारे बेकन तंत्रज्ञानावर बनवलेले खास अॅप बनवले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकास त्याची अनुभूती घेता येणार आहे.

यंदा ‘मेक इन इंडिया’, ‘गुरुत्वाकर्षण लहरी’ (लीगो) आणि ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’ या तीन विषयांवर परिसंवाद रंगणार आहेत. इंटरनेटच्या अतुलनीय प्रगतीमुळे मानवजातीचा चेहरामोहरा कसा बदलला, भविष्यात इंटरनेटमध्ये काय संधी आहेत,
यावर इंटेल लॅब्जचे संचालक जेफ डेमेन तसेच रफिक सोमाणी, कार्तिक अय्यंगार, सरावना कुमारी, डाॅ. ऋषी भटनागर बोलणार आहेत. ‘लीगो’ विषयावरील परिसंवादात अवकाश विश्वातील गुरुत्वाकर्षण लहरींची चर्चा आहे.
त्यात ‘लीगो’ संस्थेचे ब्रुस अॅलन, मुंबई आयआयटीचे ऊर्जित याज्ञिक बोलतील. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा, वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कौशिक बसू, आरबीआयच्या संचालिका दीपाली पंत आणि युनिसेफच्या दूत शर्मिला टागोर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
टेकफेस्टचे यंदाचे १९ वे वर्ष आहे. यंदा १ लाख ६५ हजार युवक टेकफेस्टला भेट देण्याची शक्यता असून २ हजार ५०० काॅलेज यात सहभागी आहेत. टेकफेस्टमध्ये सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
बातम्या आणखी आहेत...