आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I\'m Sadenned, Would Like To Appeal Modiji To Give Warning To Those Sitting In Power In Mumbai:Farooq Abdullah

शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या \'वर्षा\' बंगल्याची तोडफोड करावी- विरोधकांचे टीकास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सत्तेत राहून शिवसेनेने दंडेलशाहीचे राजकारण करू नये. पुरेशी सत्ता मिळत नसल्याने शिवसेना भाजपवर राग काढण्याऐवजी इतर घटकांवर राग काढत आहे. त्यामुळे शिवसेनेने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाची मोडतोड करावी अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेच्या हिंसक कृतीचा निषेध केला आहे.

शिवसेनेचा पाकिस्तान विरोध पुन्हा एकदा जोरदारपणे उफाळून आला. आज सकाळी मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयात शेकडो शिवसैनिकांनी धूडगूस घातला. 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'शहरियार खान गो बॅक' व 'मनोहर शशांक मुर्दाबाद' अशी घोषणा देत शिवसैनिकांनी राडा घातला. भारत-पाकिस्तान या दोन देशादरम्यान क्रिकेट संबंध पुन्हा सुरळित करण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तान क्रिकेड बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आज मुंबईत बैठक होणार होती. मात्र, याचा सुगावा शिवसेनेला लागताच त्यांनी बीसीसीआय कार्यालयात जावून राडा घातला. दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसाद देशभर उमटायला लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेवर टीकेची झोड उठवल्यानंतर आता मित्रपक्ष भाजपनेही शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक म्हणाले, शिवसेनेला पुरेशी सत्ता मिळत नसल्याने त्यांना राग आहे. मात्र, केंद्रात मोदींपुढे शिवसेनेचा वाघ मांजरासारखा झाल्याने ते अस्वस्थ आहेत. राज्यातही शिवसेनेकडे पुरेशी सत्ता नाही. भाजप त्यांना कोणतेही मानाचे पान देत नाही याचा राग शिवसेनेला आहे. त्यामुळे ते हतबल झाले आहेत. या निराशेतूनच शिवसेना इतर घटकांवर हल्ले करीत आहेत. सत्तेत राहून शिवसेना हे करीत आहे. महाराष्ट्रात युती सरकारने कायदा व सुव्यवस्था याची वाट लावली आहे. शिवसेनेने इतर घटकांवर हल्ले न करता थेट भाजपवर राग काढावा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहत असलेल्या वर्षा बंगल्याची मोडतोड करावी अशी टीका मलिक यांनी केली आहे. शिवसेनेने मित्रपक्षासोबतचे भांडण, राज्या-देशासमोर करू नये. शिवसेनेला आळा घालण्यासाठी फडणवीसांनी त्यांच्यावर कारवाई करावी असेही मलिक यांनी सांगितले.
शिवसेनेच्या या राडेबाजीवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत हिंसेला कसलेही स्थान नाही. दुस-यांची मते न ऐकता आपले म्हणणे रेटण्यालाही लोकशाहीत बिलकूल स्थान नाही. विरोध स्वीकार्य असला तरी हिंसा चालणार नाही, असे मत भाजपचे नेते मुख्तार अली नक्वी यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती संपूर्णपणे ढासळली आहे. गुलाम अली, कसुरी आणि आता शहरियार खान यांना तुम्ही कशी वागणूक देत आहात? असा सवाल काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. तर, लोकशाहीने तुम्हाला विरोध, निदर्शने करण्याचा अधिकार दिला असला तरी कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार दिलेला नाही अशी टीका शिवसेनेच्या हल्ल्यानंतर काँग्रेसने केली आहे.
शिवसेनेच्या असल्या कृतीमुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. हे शिवसेनेला का समजत नाही? मी या घटनांनी दु:खी आहे. माझी मोदीजींना विनंती आहे की, मुंबईत सत्तेत बसलेल्यांना तुम्ही सक्त ताकीद द्या. परमेश्वर सर्वांना सुबुद्धी दे अशी प्रतिक्रिया जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनी दिली आहे.
शिवसैनिकांचा अभिमान- संजय राऊत
दरम्यान, हिंसक पद्धतीने विरोध करणा-या शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. हे केवळ आंदोलन, निदर्शने नाहीत तर राष्ट्राच्या भावना आहेत असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसैनिकांनी जे काही केले ते योग्यच आहे. शशांक मनोहर यांच्याशी चर्चा करायला शिवसैनिक गेले होते. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याबाबत कोणतेही चर्चा करू नका असे ते सांगत होते. मात्र, मनोहर यांनी नकार दिला त्यामुळेच शिवसैनिकांनी निदर्शने करीत पाकिस्तानसह मनोहर यांचा निषेध केला असे राऊत यांनी सांगितले.
पाकिस्तान आमच्या जवानांची रोज मुंडके उडवत आहे आणि तुम्ही त्यांच्याशी क्रिकेट खेळायला चालला आहात?. झालेल्या घटनेचा खेद व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. उलट आम्हाला आमच्या शिवसैनिकांनी जे काही केले त्याचा अभिमान आहे. बाळासाहेबांना नेमके हेच हवे असायचे असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.