आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रचारांतील निरर्थक विषयांच्या धुरळ्यात हरवली ‘मुंबई’!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महानगरपालिकांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर असतात अाणि अापल्या लाेकप्रतिनिधींनी स्थानिक समस्यांवरच बाेलावे, त्यांच्या निवारणासाठी काम करावे, एवढीच माफक अपेक्षा मतदारांची असते. परंतु सध्या मुंबईत मनपा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये जो कलगीतुरा सुरू आहे त्यावरून ही निवडणूक लोकसभा वा विधानसभेची तर नाही ना असा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडला अाहे. राजकीय महत्त्वाकांक्षेपाेटी हाेत असलेल्या या प्रचाराच्या धुरळ्यात मुंबई मात्र हरवल्याचे चित्र आहे.   

महापालिका निवडणूक प्रचारावर मुंबईकरांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी सामान्य मुंबईकर म्हणजे रिक्षावाला, पान टपरीवाला, ट्रेनमध्ये धक्के खात नोकरीला जाणारा चाकरमानी आणि काही प्रतिष्ठित नागरिकांशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. या सगळ्यांशी बोलताना एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे,  शिवसेना- भाजप मुंबईकरांना सुविधा देण्याबाबत बोलण्याऐवजी निरर्थक विषयावर बाष्कळ चर्चा करत असल्याबद्दल मुंबईकरांमध्ये असलेली नाराजी. अंधेरी स्टेशनजवळ रिक्षा चालवणाऱ्या राधेश्याम यादव यांनी सांगितले, मी गेल्या २०-२५ वर्षांपासून इथे राहत आहे. मुंबईत काही सुधारणा झाल्या असल्या तरी खड्डे दरवर्षी तसेच दिसतात. 

महापालिका रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते, परंतु ते पैसे कुठे जातात ते कळत नाही. खड्ड्यांमुळे आमच्या रिक्षाची आणि आमचीही वाट लागते. या खड्ड्यांबाबत मात्र प्रचारात काेणीच बाेलत नाही. नोटाबंदीचा विषय आता संपला आहे तरीही त्याबाबत का बोलले जाते तेच कळत नाही. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या डॉ. आशा चरणकर यांनी सांगितले, ‘कसला प्रचार सुरू आहे तेच कळत नाही. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावरील खाद्यपदार्थ्यांच्या गाड्या यावर गेल्या अनेक वर्षांत कारवाई झालेली नाही. दिवसेंदिवस यात वाढ होताना दिसत आहे. याबाबत कोणी बोलताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदी करून देशाला एका वेगळ्या वळणावर नेले आहे. मात्र त्यावरच टीका सुरू असून स्थानिक विषयांचा मात्र विसर पडलेला दिसताे.’   

मंत्रालयासमोर पानाची टपरी चालवणाऱ्या कदम यांनाही ‘नक्की कसला प्रचार सुरू आहे?’ हा प्रश्न सतावताे अाहे. ‘रोजच्या जीवनाशी निगडीत समस्यांवर कोणीही बोलत नाही. करून दाखवल्याचे सांगतात परंतु जे केले नाही त्याबाबत काहीही बोलत नाहीत. मनपाचे काम नोटाबंदी वा सर्जिकल स्ट्राइक करणे नाही. परंतु प्रचारात हेच विषय दिसत आहेत.’ 
 
‘प्रचार भरकटलाय’  
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, ‘सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे एकमेकांवर आरोप करण्यातच या पक्षांचे नेते धन्यता मानतात. राज्याच्या अर्थसंकल्पाएवढाच मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प असताना वीज. पाणी आणि रस्त्यांसह मुंबईकरांच्या समस्यांवर बोलण्याऐवजी नोटाबंदी आणि सर्जिकल स्ट्राइकवर या राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा झडत अाहेत. खरे तर स्थानिक प्रचारात याची काहीही आवश्यकता नाही, परंतु प्रचार भरकटला आहे हे नक्की आणि मुंबईकर याची योग्य ती दखल घेतीलच.’
बातम्या आणखी आहेत...