मुंबई - भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक अाैरंगाबादेत उभारण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने मंगळवारी शिक्कामाेर्तब केले. यासाठी महापालिकेच्या हद्दीत नगर भू क्रमांक १३७८९ मधील ३०९६ चौरस मीटरचा भूखंडही निश्चित केला अाहे. हे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली समितीही नियुक्त केली आहे. ३ जून राेजी मुंडेंची प्रथम पुण्यतिथी अाहे, त्यांच्या पूर्वसंध्येला सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सरकारने मुंडेंच्या स्मारकाची घाेषणा केली हाेती. अाता त्याबाबत निर्णय घेऊन जागा नगरविकास विभागाकडे हस्तांतरण्याच्या सूचना महसूल विभागाला दिल्या आहेत. स्मारक उभारण्याचे काम सिडको करेल. त्यानुसार सल्लागार नेमणे, आराखडा तयार करण्याची कामे होणार आहेत. ही कामे झाल्यानंतर खडसे समिती आराखड्याला मंजुरी देईल.
खडसे यांच्या समितीशिवाय एक संनियंत्रण समितीही नियुक्ती करण्यात अाली. औरंगाबादचे जिल्हाधिकारी तिचे अध्यक्ष असतील. मनपा आयुक्त तसेच सिडकोचे मुख्य प्रशासक यांचा त्यात समावेश असेल. ही समिती आराखडा व संकल्प चित्र तयार करेल. याशिवाय वास्तु विशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्तीही करेल. याशिवाय स्मारकासाठी लागणा-या निधीची समितीला शिफारस करेल.
समितीत काेण?
खडसे यांच्या नेतृत्वाखालील समितीत औरंगाबादचे पालकमंत्री व पर्यावरणमंत्री रामदास कदम, मुंडेंची कन्या व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, नगरविकास प्रधान सचिव, नगरविकास सचिव, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक यांचा समावेश आहे.
स्मारकात साकारेल मुंडेंचे जीवनचरित्र
खडसे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे स्मारक उभे राहत आहे. हे स्मारक प्रेरणास्थळ ठरावे म्हणून मुंडे यांचे जीवनचरित्र येथे उभारण्यात येईल. औरंगाबाद शहरात येणा-या पर्यटकांनीही या स्मारकाला भेट देता यावी, त्यामुळे स्फूर्ती मिळेल, असा विचार करूनही स्मारक उभारले जाणार आहे. शिवाय स्मारकातच कौशल्य विभाग उभारून युवकांना फायदा देता येईल, असा विचार केला जात अाहे. याशिवाय आरोग्य केंद्रही निर्माण केले जाईल.
पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री