आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबरमध्ये कांदा होईल स्वस्त, दिव्य मराठीशी केलेल्या बातचीतमध्‍ये विखेंचा विश्‍वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात 17 लाख क्विंटल कांदा बाजारात येणे अपेक्षित आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती कमी होतील, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. तसेच कांद्याच्या किमतीत झालेली वाढ तात्पुरती असून अशा वेळी साठेबाजी करणार्‍या किंवा प्रचंड किमतीने कांदा विकणार्‍या व्यापारी आणि दुकानदारांविरोधात कायद्याचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

कांद्याची किंमत 70 रुपये किलोपर्यंत गेल्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे. तसेच काही दिवसांत कांदा 90 रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या वेळी विखे म्हणाले, सरकारने सुरू केलेल्या स्वस्त भाजीपाला दुकानांमधून 40-45 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध असून दुकानदारांनाही त्या दरात कांदा देणे शक्य आहे. खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्यावर्षी 65 हजार हेक्टर जमिनीवर कांद्याची लागवड करण्यात आली होती; पण यावर्षी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ती लागवड केवळ 15 हजार हेक्टर जमिनीवर झाली. तरीही ऑक्टोबरमध्ये पुणे परिसरात आठ हजार क्विंटल, नाशिकमधून 1.5 लाख क्विंटल कांदा येईल. त्यामुळे किमतींमध्ये नक्कीच फरक पडेल.


तसेच या वेळी आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्येही कांद्याचे उत्पादन घटल्याने एकूणच बाजारात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, कर्नाटकमध्ये पाच लाख क्विंटलपर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याने गरज पडल्यास कांदा त्यांच्याकडून घेता येईल, असे ते म्हणाले. मुंबईसारख्या ठिकाणी 121 सरकारी दुकानांमधून कांद्याची किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आपल्या विभागाने केला आहे. मात्र, काही व्यापार्‍यांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन किमती वाढवल्या आहेत. कांद्याची साठेबाजी आढळल्यास व्यापार्‍यांविरोधात मेस्माचा वापर करू, असेही ते म्हणाले.

दिल्लीला दररोज 300 क्विंटल कांदा पुरवू
कांद्याचे भाव वाढले की, लोकांच्या तक्रारी येतात. शेतकर्‍यांना 50 पैसे प्रतिकिलोने कांदा विकावा लागला तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी आले होते. हे विसरता कामा नये. तसेच ग्राहकांना वाढत्या किमतींचा त्रास होऊ नये म्हणून सरकारचे विविध प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री आणि केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. व्ही थॉमस यांच्याशी बोलून राज्यातील परिस्थितीचा अंदाज त्यांना दिला आहे. दिल्लीमध्ये तर कांद्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली असून तिथे 300 क्विंटल कांदा दररोज पाठवण्यासाठी तयारी असल्याचे ते म्हणाले.

दरवाढीची कारणे
कांद्याच्या दरवर्षीच्या दरवाढीला दुष्काळ, साठवणूक क्षमतेचा अभाव, कोरडवाहू शेती अशी विविध कारणे आहेत. कोरडवाहू शेतीला सिंचनाच्या माध्यमातून योग्य पाणीपुरवठा करून कांद्याचे पीक तीन वेळा घेता येऊ शकते. कांदा हे नाशवंत पीक असल्याने त्याच्या साठवणुकीवर र्मयादा येतात. त्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तसेच साठवणूक क्षमताही वाढवायला हवी, असे विखे म्हणाले