आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फेमा’बाबत नोटिसीला बीसीसीआयचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ‘आयपीएल’ स्पर्धेदरम्यान परकीय चलन विनिमय (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल बजावलेल्या नोटिसीला ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बुधवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआय व आयपीएल आयोजन समितीने अफ्रिकेतील स्थानिक बँकेत खाते उघडले होते. त्या वेळी या बँकेत 5 कोटी डॉलर्स हस्तांतरित करण्यात आले होते. या हस्तांतरणामुळे ‘फेमा’चे उल्लंघन झाल्याचाठपका ठेवत सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली. तसेच मनोहर यांनाही नोटीस बजावली. ज्येष्ठ विधिज्ञ राजू सुब्रमण्यम यांनी नोटिसीला आव्हान दिले. आफ्रिकेतील बँकेत खाते उघडण्यापूर्वी व पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेण्याचाच सल्ला मनोहर यांनी आयपीएल नियोजन समितीला दिला होता. आयपीएलच्या दैनंदिन व्यवहारात मनोहर यांचा हस्तक्षेप नव्हता. आयपीएलचे अध्यक्ष मोदीच निर्णय घेत असत. त्यामुळे मनोहर यांचा पैसे हस्तांतरणाशी संबंध नाही. हे खाते बीसीसीआयने नव्हे, तर आयपीएल आयोजन समितीने उघडल्याचा युक्तिवादही त्यांनी केला.

त्या वेळी मनोहर यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे सक्तवसुली संचालनालयाचे म्हणणे नाही. या प्रकरणाची चौकशी अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. त्यामुळे केवळ चौकशीसाठी मनोहर यांना बोलावले असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केव्हिक सेटलवाड यांनी मनोहर यांना नोटीस बजावण्याच्या कृतीचे समर्थन केले.