आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - मुंबई विमानतळावर एका महिलेस सुरक्षा कर्मचा-यांकडून संवेदनहीनतेचा सामना करावा लागला. सुरक्षा चौकशीचे कारण देत कृत्रिम पाय काढून दाखवावे, असे कर्मचा-यांनी अपंग महिलेस सांगितले. परंतु कृत्रिम पाय काढण्यासाठी त्या महिलेस कपडेही उतरवावे लागले असते. तब्बल अर्धा तास विनवणी केल्यानंतर कर्मचा-यांना पीडित महिलेस सोडले. विमानतळ प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
37 वर्षीय महिला सुरंजना घोष यांच्या वाट्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी प्रसंग आला. घोष यांचा एक पाय गुडघ्यापेक्षा वरपर्यंत कापला गेलेला आहे. त्या कृत्रिम पायाच्या आधारे चालतात. त्यांनी सांगितले की, पाच जुलै रोजी त्या आईसह मुंबईहून दिल्लीला जात होत्या. सीआयएसएफच्या सुरक्षा कर्मचा-यांनी त्यांना चौकशीसाठी थांबवले. त्यांनी सुरंजना यांना कृत्रिम पायाबाबत विचारणा केली. त्यांना तो पाय काढून तपासणी करण्यास सांगण्यात आले. पाय काढण्याबाबत सुरंजना यांनी त्यांची अडचण सांगितली. कारण तो पाय काढायचा झाला तर त्यांना कपडेही उतरवावे लागले असते. त्यांनी त्या अपंग असल्याचे ओळखपत्र, कागदपत्रे दाखवली. परंतु अधिकारी मानण्यास तयार नव्हते. त्यांनी पाय काढून तपासणी करू देण्याचा हेका काम ठेवला. अर्धा तास त्यांच्यात वाद सुरू होता. एवढा वेळ सुरंजना आणि त्यांच्या आईला तेथेच ताटकळत ठेवण्यात आले.
अखेरीस सुरक्षा अधिका-यांनी एक्सप्लोझिव्ह ट्रेस डिटेक्टरद्वारे (ईटीडी) तपासणी केल्यानंतर अधिका-यांनी त्यांना जाऊ दिले. या घटनेमुळे घोष कुटुंबीयांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, सीआयएसएफच्या महासंचालकांनी सांगितले की, कृत्रिम पाय काढून तपासणी करण्याचा कोणताच नियम नाही. सुरंजना यांच्याबाबतीत घडलेला प्रकार दुर्दैवी असून त्याची चौकशी केली जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.