आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In The Presence Of Pm Modi Cm Chavan Say Maharashtra Is Number One

महाराष्ट्र नंबर वनवरून मुख्यमंत्र्यांचे चिमटे; मोदींचीही चव्हाणांना कोपरखळी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जेएनपीटी सेझच्या उद्घाटन समारंभावेळी एकत्र आले होते)
मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभर गुजरात मॉडेलची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून आणली होती. गुजरात मॉडेल देशात कसे सर्वोत्तम आहे याचे गोडवे मोदींसह संपूर्ण भाजप गात होता. मात्र, आज त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चोख उत्तर दिले तेही पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत. औद्योगिकरण असो, जीडीपी असो इतर कोणत्याही बाबतीत महाराष्ट्र आज देशात नंबर एकचेच राज्य असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी ठणकावून सांगितले. त्यावेळी मोदींनी शांत राहणे पसंत केले मात्र, नंतर आपल्या भाषणात मोदींनी चव्हाण यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
रायगड जिल्ह्यातील उरण जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) सेझचे व महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. तसेच जेएनपीटीसाठी जमीन देणा-या शेतक-यांना त्यांच्या जमिनीच्या साडेबारा टक्के परताव्याची कागदपत्रे मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वाटण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री व मोदी यांच्यात यावरून जुगलबंदी रंगली.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जेएनपीटीतील विकासकामांचे प्रश्न मार्गी लावण्यासह नवी मुंबईतील विमानतळाबाबत निर्णय घेण्याची विनंती केली. याचवेळी मोदी यांचे नाव घेत महाराष्ट्र देशात नंबर एकवर असल्याची टिप्पणी केली. महाराष्ट्र देशात औद्योगिकीकरण, जीडीपी, सेवाक्षेत्र, नागरी सुविधा, कृषी क्षेत्रांसह अनेक बाबींत नंबर एकवर असल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात आपले सहकार्य राहील व महाराष्ट्र देशात नंबर एकवर राहण्यास आपले सहकार्य हवे. आपले सहकार्य मिळाल्यास महाराष्ट्र देशाची सेवा करीत राहील असा चिमटा काढला. यानंतर मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र नंबरच्या एक मुख्यमंत्र्यांच्या भाष्यावर टिप्पणी केली नाही. मात्र, जेएनपीसीसह विकासकामांना माझे प्राधान्य असल्याचे सांगितले. तसेच जेएनपीटीसह येथील सर्वच प्रश्न जुनेच आहेत. मुख्यमंत्र्यांनी मला करण्यास सांगितले आहे. ते आम्ही करणारच आहोत पण मुख्यमंत्र्यांना आधीच्या सरकार (मनमोहन सिंग यांच्या) ला सांगणे कठिण जात होते अशी कोपरखळी मारत चव्हाण यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
उरणमधील कार्यक्रमानंतर सोलापूरात झालेल्या जाहीर सभेतही पंतप्रधान मोदींनी वीजटंचाई व कोळसा उपलब्ध नसल्यामुळे मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री चव्हाण यांना कोपरखळ्या हाणल्या.