आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची शून्य तयारी; राष्‍ट्रवादी मा‍त्र जोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप, शिवसेनेसह मित्रपक्ष राष्‍ट्रवादी कॉँग्रेसनेही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असताना कॉँग्रेसच्या गोटात शांतताच आहे. त्यामुळे या पक्षाच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकांच्या दृष्टीने साधे सूतोवाचही केलेले नाही, तर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे एकटेच छोटे-मोठे दौरे काढत आहेत. संपूर्ण पक्षाकडे लोकसभेसाठी काहीच आराखडा नाही आणि कोणावरही अद्याप जबाबदारी निश्चित केलेली नाही.
गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठ्या फेरबदलांनंतर काँग्रेसमध्येही काही बदल होतील, अशी अपेक्षा फोल ठरली असून निवडणुकीची काहीच तयारी सुरू झालेली नाही. दरवेळी केवळ दलित आणि मुस्लिम मतांवर अवलंबून
राहण्याची पद्धत या वेळी उपयोगी पडणार नसून मतदारांना महाराष्ट्रामध्ये इतरही पर्याय आहेत, असे काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याने सांगितले. काँग्रेस सत्तेत आहे, महत्त्वाची खाती काँग्रेसच्या मंत्र्यांकडे आहेत. अशा वेळी चांगले निर्णय घेऊन लोकांमध्ये जाणे गरजेचे आहे. पण त्याबद्दल मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत, अशी
तक्रार या मंत्र्याने केली.


गटातटाचीच डोकेदुखी
काँग्रेस राज्यात लोकसभेच्या 26 जागा लढवणार आहे. अशा वेळी निवडून आलेले खासदार, हरलेल्या मतदारसंघातील परिस्थिती, प्रलंबित कामे, लोकांचे प्रश्न याचा काहीतरी लेखाजोखा पक्षाजवळ असणे गरजेचे आहे. पण त्याबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. निदान पक्षातील मंत्र्यांना एकत्र बोलावून निवडणुकीबाबत चर्चा किंवा काही विचारणाही मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही, असे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असणा-या काँग्रेसच्या आणखी एका मंत्र्याने सांगितले. तसेच पक्षामध्ये मुख्यमंत्री एका बाजूला व प्रभारी मोहन प्रकाश आणि माणिकराव ठाकरे एकीकडे असे स्पष्ट गट पडले आहेत. त्यामध्ये एकत्र येऊन काम करण्यावर जोर देण्यापेक्षा मुख्यमंत्री गटाचे काही जण प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात बातम्या पेरण्याचे काम करतात. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसतो हे ते विसरून जातात, असे त्या मंत्र्याने सांगितले.


महामंडळांचे भिजत घोंगडे, मंत्रिपदेही रिक्त
प्री कॅबिनेट बैठकीतही मुख्यमंत्री निवडणुकांच्या दृष्टीने फार काही बोलत नाहीत. पक्षात दिल्लीवरून हालचाली होत असल्या तरी राज्यातही काही निर्णय घ्यावेच लागतात. पण दुर्दैवाने तसे होत नसल्याची खंत विदर्भातील एका मंत्र्याने व्यक्त केली. काँग्रेसमध्ये अद्यापही महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. मग कार्यकर्त्यांना ताकद देणार कशी, असा सवाल या मंत्र्याने केला. कॉँग्रेसच्या कोट्यातील तीन मंत्रिपदे रिक्त असून त्याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्याचा मोठा परिणाम होताना दिसत नाही, असे त्या मंत्र्याने सांगितले. त्यामुळे गाफील राहणे आणि निष्क्रियता पक्षाच्या मूळावर येऊ शकते, अशी भीती काँग्रेसचे मंत्री व्यक्त करतात.

शरद पवार लावणार कार्यकारिणीला कात्री
मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 165 जणांची जम्बो कार्यकारिणी नियुक्त केली होती. यामध्ये तब्बल 22 उपाध्यक्ष, 55 सरचिटणीस, 75 चिटणीस, 13 प्रवक्ते असा भरणा होता. मात्र आता नवे अध्यक्ष व कार्याध्यक्षांनी पदाधिका-यांची संख्या इतकी प्रचंड ठेवू नये, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नव्या कार्यकारिणीत आता सहा उपाध्यक्ष, 12 सरचिटणीस व 12 चिटणीस अशा 30 जणांचाच समावेश असेल. अनेकदा विशिष्ट जाती, समाज डोळ्यासमोर ठेवून कार्यकारिणीत पदाधिकारी वाढविले जातात. मात्र संख्या वाढल्याने एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या घालण्याचे काम होते, असे ज्येष्ठ नेत्यांचे मत झाले आहे.