मुंबई - शुक्रवारी सकाळी सातची वेळ ...ठिकाण बांद्रा टर्मिनस ..बांद्रा - वापी पॅसेंजरला एक विशेष वातानुकूलित डबा जोडण्यात आला. पॅसेंजर ट्रेनला विशेष डबा जोडल्याने प्रवाशांच्या भुवया उंचावल्या गेल्या; पण काही क्षणांतच अधिकार्यांच्या गोतावळ्यात मुख्यमंत्री स्टेशनवर अवतरले आणि सगळ्या घडामोडींचा उलगडा झाला. मुख्यमंत्री डब्यात विराजमान झाले.. आणि गाडी रवाना झाली....
पालघर या राज्याच्या छत्तीसाव्या जिल्ह्याच्या शासकीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालघरला शासकीय गाड्यांच्या ताफ्याऐवजी चक्क रेल्वेने जाणे पसंत केले. या प्रवासात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्र्यांचे सहप्रवासी होते. मुख्यमंत्री नऊच्या सुमारास पालघरला पोहोचताच स्टेशनवर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर विविध शासकीय कार्यालयाच्या उद्घाटनाचे कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री पुन्हा त्याच विशेष बोगीने तीनच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ही बोगी गुजरात एक्सप्रेसला जोडण्यात आली होती.
शुक्रवारी महाराष्ट्राचा छत्तीसावा जिल्हा म्हणून पालघर जिल्हा अस्तित्वात आला. या जिल्ह्याच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्याधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी आदिवासीबहुल असलेला हा जिल्हा संपुर्ण देशात आदिवासी विकासाची प्रयोगशाळा ठरेल असे आश्वासन जिल्ह्यातल्या जनतेला दिले. यावेळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित आणि नवनियुक्त मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रियही उपस्थित होते.
दुसरे मुख्यमंत्री
शासकीय कार्यक्रमासाठी ठाणे जिल्ह्यात रेल्वेने जाणारे पृथ्वीराज चव्हाण हे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. या अगोदर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे मुंबई ते ठाणे असा रेल्वे प्रवास करून आले असल्याची आठवण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार यांनी आपल्या भाषणात करून दिली.