आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Income Tax Department And NIA Seized Four Trucks Of Money From Mumbai Central Railway Station

पैशांची वाहतूक बेकायदेशीर, अंगडियांच्‍या ट्रकमधील कोट्यवधी रुपयांची चौकशी सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विभाग आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांनी सोमवारी संयुक्त कारवाई करुन गुजरातला जाणा-या चार ट्रकमधून कोट्यवधींची रोख रक्‍कम जप्‍त केली आहे. मुंबई सेंट्रल रेल्‍वे स्‍थानकाबाहेर रात्री उशिरा ही कारवाई करण्‍यात आली. हे ट्रक अंगाडियांचे (सराफा व्‍यायसायिकांच्‍या मालाची वाहतूक करणारे) असून ते गुजरातला जाणार होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या ट्रक्समध्‍ये पैशांनी भरलेल्‍या 150 बॅग्‍स आढळून आल्‍या. याशिवाय सोने, हिरे तसेच मौल्‍यवान दागिनेही आढळले आहेत. हा सर्व माल जप्‍त करण्‍यात आला असून चौकशी सुरु झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या ट्रकमधील माल गुजरात मेलमधून गुजरातमध्ये हवालाच्‍या माध्‍यमातून पाठवला जाणार होता. परंतु, वेळीच धाड टाकून संपूर्ण मुद्देमाल जप्‍त करीत 50 जणांना अटकही करण्‍यात आली आहे. प्राप्तीकर विभागाच्‍या सिंधिया हाऊस या कार्यालयात संपूर्ण माल मोजण्‍याचे काम सुरु आहे.

प्राप्तीकर खात्‍याचे महासंचालक स्वतंत्रकुमार यांनी कारवाईसंदर्भात माहिती दिली. ते म्‍हणाले, या छाप्यात अनेक मोठ्या बॅग्स सापडल्या आहेत. प्राप्तीकर खात्‍याचे 50 अधिकारी या कारवाईत गुंतलेले आहेत. नोटांची मोजणी करण्यासाठी आम्ही बँक अधिकाऱ्यांनाही पाचारण केले आहे. तर हिरे आणि दागिन्यांची पडताळणी तसेच किंमत ठरवण्यासाठी नोंदणीकृत जवाहि-यांना बोलावण्यात आले आहे. या कारवाईत ज्या सराफांचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांनी खातेपुस्तकांमधील नोंदी आम्हाला दाखवल्या आहेत. या नोंदी योग्‍य आढळल्‍यास आम्‍ही दागिने जप्त करणार नाही. रोख रकमेचीही नोंद योग्‍य असल्‍यास हरकत नाही. परंतु, एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे पैसे पाठवण्याची ही पद्धत कायदेशीर नाही. त्यामुळे त्यावर कारवाई होईल, असे स्‍वतंत्रकुमार यांनी स्‍पष्‍ट केले.