आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incomplete Dream Of Balasaheb Thakare\'s Memorial

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे स्वप्न अपूर्णच!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्यांच्या एका इशा-यावर समस्त शिवसैनिक रस्त्यावर उतरत होते, त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची उभारणी दोन महिने झाले तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते करू शकले नाहीत, अशी खंत शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. बुधवारी शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी होत असून या पार्श्वभूमीवर स्मारकाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर संजय राऊत आणि मनोहर जोशी या नेत्यांनी कोणत्याही स्थितीत शिवाजी पार्कवरच बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. त्यांच्या शब्दाखातर शिवसैनिकांनी राज्य सरकार, पोलिसांशी पंगाही घेतला. मात्र बाळासाहेबांच्या निधनाला दोन महिने उलटले तरी अद्याप स्मारकाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. खरे तर पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या मागे लागून स्मारक उभारण्याची तयारी करावयास हवी होती, परंतु राज्य सरकार, पालिका प्रशासन आणि उच्च न्यायालयाचे बंधन यामुळे शिवसेनाप्रमुखांचे शिवाजी पार्क मैदानात साकारले जाणारे स्मृतिस्थळ केवळ कागदावरच राहिले आहे.

23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जन्मदिनी हे स्मृतिस्थळ व्हावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली, मात्र शिवसेना नेत्यांनी माघार घेतली.
पदाधिका-यांची गोची
उच्च् न्यायालयाने या मैदानावर कोणतेही बांधकाम करण्यास निर्बंध टाकले आहेत. शिवाजी पार्कवर स्मारक तयार करताच येणार नाही, असे पालिकेने शिवसेनेला सुनावले होते. त्यामुळे नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या उजव्या बाजूला असलेल्या जागेत स्मृतिस्थळ उभारण्याचे ठरविले अन् कार्यकर्त्यांनी आधीच्या जागेवरील हक्कसोडला.
अजून जागाच ठरेना
पालिकेने शिवसेनेला जागा सुचवली पण न्यायालयीन निर्बंध असल्याने त्या जागेत केवळ मातीचाच चौथरा करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या जागेतही शिवसेना स्मारक उभारू शकली नाही. कोणतेही बांधकाम नसलेले स्मारक सुरक्षितेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे मुद्दा उपस्थित करत मनसेनेही स्मारकाला विरोध केला होता.
नेते गप्प का?; शिवसैनिकांचा प्रश्न
संजय राऊत, मनोहर जोशींच्या घोषणाबाजीची दखल घेताना उद्धव ठाकरे यांनी ‘स्मारकाबाबतचा निर्णय शिवसैनिकच घेतील’ असे म्हटले होते, परंतु दोन महिन्यात तसे काहीही झाले नाही. त्यामुळे ‘बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत शिवसेना नेते गप्प का?’ असा प्रश्न शिवसैनिकच विचारत आहेत. स्मारक हा शिवसेनेचा पक्षीय प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यतेची गरज आहे अशी प्रतिक्रिया मनसेच्या नेत्याने दिली.