आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Incomplete Project Report In Front Of Prime Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रखडलेले प्रकल्प पंतप्रधानांसमोर येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नवी मुंबई विमानतळ, विरार-अलिबाग कॉरिडोर, न्हावा-शिवा ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो व मोनोरेल्वे हे रखडलेले प्रमुख प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आता थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाच साकडे घालणार असल्याचे समजते. पंतप्रधान 18 किंवा 19 ऑगस्टच्या दरम्यान एक दिवस मुंबई दौ-यावर येणार असून त्यावेळी विकास कामांबद्दल पृथ्वीराज चव्हाण त्यांच्यापुढे सादरीकरण करणार असून त्याद्वारे अतिरिक्त निधी, पर्यावरणाशी संबंधित परवानगी आणि जमीन संपादनाचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला जाणार आहे.
या सादरीकरणाची सर्व जबाबदारी मुख्य सचिव जे. के. बांथिया यांच्याकडे दिली असून त्यामध्ये आतापर्यंत पूर्ण झालेल्या विकास कामांचा आढावाही पंतप्रधानांना देण्यात येईल. यातील काही प्रकल्प हे निधी अभावी व काही प्रकल्प पर्यावरणाची परवानगी नसल्याने खोळंबले आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी प्रामुख्याने अतिरिक्त निधी यावेळी मुख्यमंत्री मागणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिका-याने सांगितले. तसेच कोस्टल रोड व न्हावा-शिवा ट्रान्स हार्बर लिंकसारख्या प्रकल्पांच्या बांधकामामध्ये पर्यावरणाचा काही प्रश्न उपस्थित होत असून तेही अडथळे पंतप्रधानांच्या मदतीने दूर करण्याचा प्रयत्न यावेळी मुख्यमंत्री करणार आहेत.
मुंबईतील मेट्रोचा पहिला टप्पाही अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये मेट्रो रेल्वेसाठी लोकांच्या राहत्या जागा व इमारती रिकाम्या कराव्या लागत असल्याने अनेक प्रकरणे न्यायालयात गेली आहेत. अशावेळी जमीन संपादन ही एक मोठीच डोकेदुखी सरकारसाठी ठरत असून न्यायालयात प्रकरणे असल्याने काहीच निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे मेट्रोचे कामही अपेक्षित वेगात होत नाही. पर्यायाने त्याचा खर्च मात्र वाढत चालला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी लक्ष घातले तर हे प्रकल्प लवकर मार्गी शकतील, अशी सरकारला आशा वाटते.