आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-मलेशियाने एकत्रित चित्रपट काढावा, मलेशियाच्या राणी नूर सुजाना यांची अपेक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारत आणि मलेशिया दोन वेगळे देश असले तरीही बॉलीवूडने दोन्ही देशांना जोडलेले आहे. त्यामुळे या दोन्ही देशांनी एकत्र येऊन चित्रपट निर्मिती करावी, अशी अपेक्षा मलेशियाच्या राणी तोहपान नूर सुजाना अब्दुल्ला यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.


भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मलेशियाने एक योजना तयार केली असून त्यासाठी एक विशेष अल्बम ‘तुम मिले’ तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अल्बममध्ये नूर सुजाना यांनी हिंदी गाणी गायली आहेत. शुक्रवारी रात्री ताज हॉटेलमध्ये या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी नूर यांनी ‘दिव्य मराठी’शी आपले गायन आणि बॉलीवूडच्या प्रेमाबाबत गप्पा मारल्या. नूर सुजाना या तोहपानबेंधारा केडाह राजघराण्याच्या असून पर्यटन वाढवण्याबाबत त्या विशेष प्रयत्न करीत आहेत. त्या म्हणाल्या की मला लहानपणापासूनच गाण्यांची, हिंदी चित्रपटांची आवड आहे. बॉबी, संगमसारखे उत्कृष्ट चित्रपट एक वेगळा आनंद देणारे आहेत. लता मंगेशकर, किशोरकुमार आणि मोहंमद रफी माझे आवडते गायक आहेत. राजघराण्यात आल्यानंतर माझ्या पतींनी मला गाण्याचा छंद पुढे नेण्यास मदत केली. मी काही अल्बम तयार केले असून ते चॅरिटीसाठी वापरण्यात आले आहेत. त्यामध्ये मी हिंदी गाणी मलेशियन संगीताच्या आधारे तयार करून गायलेली आहेत. उदित नारायण, अभिजित या गायकांबरोबर मी गाणी गायलेली आहेत. माझा हा नवा अल्बम ‘तुम मिले’मध्ये चार गाणी असून ती मी कुमार सानूबरोबर गायली आहेत.


फिल्मसिटी तयार करणार
नूर म्हणाल्या की, हिंदी चित्रपट जगभरात लोकप्रिय आहेत. हे चित्रपट नाट्य, रोमान्स, अ‍ॅक्शन आणि अभिनय अशा चार प्रकारात असतात. हा प्रकार अन्य चित्रपटांमध्ये दिसत नाही. मलेशियात हिंदी चित्रपट लोकप्रिय असतात. त्यामुळे आम्ही मलेशियात एक फिल्मसिटी तयार करणार आहोत. भारतातला नायक मलेशियन मुलीच्या प्रेमात पडतो अशा प्रकारची कथा पडद्यावर मांडली तर ती नक्कीच चालेल.