आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक कलाकार खबरे नसतील हे कशावरून, सलमानने पाकिस्तानात जावे- राज ठाकरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलाकार दहशतवादी नसतील, पण पाकिस्तानचे खबरे नसतील कशावरून, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करू देण्याबाबतच्या मनसेच्या भूमिकेला सिने अभिनेता सलमान खान याने विरोध केल्यानंतर आता त्याच्या विरोधात थेट राज ठाकरेच मैदानात उतरले आहेत. सलमान खानच्या सिनेमांवर बहिष्कार टाकावा, त्याशिवाय तो सुधारणार नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले. भारत सरकार पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देते, वर्क परमिट देते म्हणूनच पाकिस्तानी कलाकार भारतात येऊन काम करतात, अशी भूमिका घेत सलमान खान याने दिल्लीतील एका कार्यक्रमात पाकिस्तानी कलाकारांवर बंदीला विरोध केला होता. सलमानच्या या भूमिकेबाबत मनसेने संताप व्यक्त केला आहे. त्याला जर पाकिस्तानी कलाकारांचा इतका पुळका येत असेल, तर त्याने पाकिस्तानात जावे, वर्क परमिट घ्यावे आणि तिकडे शूटिंग करावे, असा खोचक सल्ला राज यांनी दिला आहे.
कृष्णकुंजवर पत्रकार परिषदेत राज यांनी पाक कलाकार असलेले चित्रपट चालू देणार नसल्याच्या भूमिकेचाही पुनरुच्चार केला. आमचे जवान छातीवर खऱ्या गोळ्या झेलतात. यांच्यासारख्या खोट्या गोळ्या खात नाहीत. सलमान कधी आपल्या सैनिकांच्या बलिदानाबद्दल बोलला आहे का, असा सवालही त्यांनी केला.
आपल्या देशात गुणी अभिनेते कमी आहेत का,असा सवालही त्यांनी केला. पाकिस्तानी कलाकारांपेक्षा त्यांना बोलावणारे भारतीय निर्मातेच खरे दोषी असल्याचेही ते म्हणाले.
दोन चित्रपट अधांतरी
उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर हाकलण्याची मोहीम हाती घेतली होती. करण जोहरच्या आगामी “ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि शाहरुख खानच्या “रईस’ या आगामी चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री मायरा खान प्रमुख भूमिकेत असल्याने हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली होती. परिणामी करण जोहर याने राज ठाकरेंची समजूत घालण्याची विनंती सलमान खानला केली होती. राज आणि सलमान यांचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता जोहर याच्या चित्रपटाला मनसेचा विरोध मावळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र राज ठाकरेंच्या सलमान खानवरील टीकेमुळे या दोन्ही चित्रपटांचे भवितव्य अधांतरी असल्याचे चित्र आहे.
बातम्या आणखी आहेत...