आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Court Finds 12 Guilty Of 2006 Mumbai Train Bombings

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेचा निकाल; १२ दोषी; फाशीची शिक्षा होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपींना न्‍यायालयात नेताना पोलिस. - Divya Marathi
आरोपींना न्‍यायालयात नेताना पोलिस.
मुंबई - मुंबईत नऊ वर्षांपूर्वी उपनगरी रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष ‘मकोका’ न्यायालयाने नऊ वर्षांनंतर शुक्रवारी १३ पैकी १२ आरोपींना दोषी ठरवले. एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सर्वदोषी बंदी घालण्यात आलेल्या सिमीशी संबंधित आहेत. सर्वदोषींच्या शिक्षेवर सोमवारपासून सुनावणी होणार आहे. त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते. या स्फोटात १८८ जण ठार, तर ८२९ जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांनी शुक्रवारी निकाल दिला. दोषी ठरवलेले सर्व जण स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.

हे १२ जण भादंवि, स्फोटके कायदा, बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, भारतीय रेल्वे कायदा आणि मकोकानुसार दोषी आढळले. आरोपींपैकी पाच जण खुनाच्या आरोपावरून (भादंवि ३०२) दोषी आढळले. त्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते. सर्व १२ आरोपी मकोकाच्या कलम ३ (१) (आय) नुसार दोषी आढळले असून त्यांनाही फाशीची शिक्षा होऊ शकते.
अवघ्या १० मिनिटांत घडवले स्फोट
११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या सात उपनगरी रेल्वे गाड्यांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट झाला होता. अवघ्या १० मिनिटांच्या कालावधीत ७ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. खार रोड-सांताक्रूझ, बांद्रा-खार रोड, जोगेश्वरी-माहीम जंक्शन, मीरा रोड-भाइंदर, माटुंगा-माहीम जंक्शन आणि बोरिवली येथे हे स्फोट झाले.
खटल्याला वेगळे वळण
रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटासह २००५ पासून झालेल्या सर्व बॉम्बस्फोटांसाठी इंडियन मुजाहिदीनचे (आयएम)सदस्य जबाबदार आहेत, असे इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक सादीक शेख याने २००८ मध्ये पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले होते. त्यामुळे सादिकला बचाव पक्षाचा साथीदार म्हणून बोलवावे, अशी मागणी बचाव पक्षाने केली होती. त्यामुळे या खटल्याला वेगळेच वळण मिळाले होते. न्यायालयाने सादिकला बचाव पक्षाचा साक्षीदार म्हणून त्याची उलटतपासणी करण्याची परवानगी दिली होती.
विलंबावर प्रश्नचिन्ह
या खटल्याच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. परंतु ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी तपास केला, ते या निकालामुळे समाधानी आहेत. मुंबई पोलिस आणि एटीएसने संपूर्ण तपास केला. न्यायालयाने आमचे आरोपपत्र स्वीकारले. प्रारंभी हे प्रकरण अगदीच अंधारात होते. आमच्याकडे कोणताच पुरावा नव्हता, असे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ए. एन. रॉय यांनी म्हटले आहे.
दोषी ठरलेले १२ आरोपी
कमाल अहमद अन्सारी (३७), तनवीर अहमद अन्सारी (३७), महंमद फैसल शेख (३६), एहतेशाम सिद्दिकी (३०), महंमद माजीद शफी (३२), शेख आलम शेख (४१), महंमद साजीद अन्सारी (३४), मुजम्मील शेख (४३), सोहेल मेहमूद शेख (४३), जमीर अहमद शेख (३६), नवीद हुसैन खान (३०) आणि असिफ खान (३८).
आझम चिमासह १७ आरोपी फरार
बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान १३ आरोपींना अटक करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. हे सर्व जण भारतीय आहेत. दहशतवादविरोधी पथकाने नोव्हेंबर २००६ मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात ३० जणांवर आरोप ठेवला होता. त्यापैकी १७ जण फरार असून ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे म्हटले जाते. त्यात लष्कर-ए- तैयबाचा सदस्य आझम चिमाचाही समावेश आहे.
घटनाक्रम असा
- ११ जुलै २००६ : उपनगरी रेल्वेत १० मिनिटांत ७ बॉम्बस्फोट, १८८ जण ठार, ८२९ जखमी.
- २० जुलै ते ३ ऑक्टो. २००६ एटीएसकडून १३ आरोपींना अटक. त्यापैकी ११ जणांनी स्फोटात सहभागी असल्याचा जबाब नोंदवला, पण नंतर त्यांनी घूमजाव केले.
- नोव्हेंबर २००६ : एटीएसने दाखल केले ३० जणांवर आरोपपत्र.
- २००८ : सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणीला स्थगिती. तत्पूर्वीच सरकारी पक्षाने एका पोलिस अधिकाऱ्याची साक्ष नोंदवली होती.
- २३ एप्रिल २०१० : सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली. त्यानंतर साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
- १९ ऑगस्ट २०१४ : विशेष मकोका न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सुनावणी पूर्ण केली.

पुढील स्‍लाइडवर वाचा कसे झाले होते बॉम्बस्फोट....