आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Muzahideen's Terrorist Usmani Escaped With His Nephew

इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी उस्मानीसोबत त्याचा भाचाही फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - इंडियन मुजाहिदीन संघटनेचा अतिरेकी अफजल उस्मानी ज्या दिवशी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला त्या दिवसापासून त्याचा भाचाही फरार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.


जावेद खान असे उस्मानीच्या भाच्याचे नाव असून तो धारावी येथे राहत होता. गेल्या महिन्यात सूरत बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याच्या दिवशी उस्मानी भर न्यायालयातून पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांची चौकशी सुरू केली. ज्या दिवशी उस्मानी फरार झाला तेव्हापासून जावेदही बेपत्ता झाला आहे. उस्मानी हा गुजरात येथील तुरुंगात असताना जावेदने गेल्या दोन वर्षांत त्याची अनेकदा भेट घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.


उस्मानीला त्याचा भाऊ देखील नेहमी भेटत असे. 20 सप्टेंबर रोजी जावेद नमाजला जाण्यासाठी दुपारी 1 वाजता घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो अजूनही घरी परतला नसल्याचे एका पोलिस अधिका-याने सांगितले. तसेच त्याचा मोबाइलही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. तो गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा खानवरील संशय वाढला असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


उस्मानीच्या शोधासाठी 14 पथके
20 सप्टेंबर रोजी उस्मानी न्यायालयातून फरार झाला. घटनेला महिना होत आला तरी अजूनही त्याचा शोध लागत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांची मोठी नाचक्की होत आहे. त्याच्या शोधासाठी राज्य दहशतवादी पथकाने (एटीएस) सुमारे 14 पथकांची स्थापना केली असून देशभरात त्याचा शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पोलिस त्याच्यावर इनाम ठेवणार असल्याचे सांगण्यात येत होते.