आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याचे ‘प्रभू ज्ञानमंदिर’ बनले देशातील पहिले ‘किंडल ग्रंथालय’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतातील पहिले “किंडल ग्रंथालय’ पुण्यात सुरू झाले आहे. लेखिका डॉ. मीना प्रभू यांनी स्वखर्चाने उभारलेल्या प्रभू ज्ञानमंदिर ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांसाठी किंडलच्या माध्यमातून सुमारे दहा लाख पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच या ग्रंथालयात प्रवास या विषयाला वाहिलेली मराठी व इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे एक परिपूर्ण दालन असणार आहे. 
  
माझं लंडन, इजिप्तायन, गाथा इराणी, ग्रीकांजली, तुर्कनामा, दक्षिणरंग अशी एकाहून एक सरस चौदा प्रवासवर्णने लिहिणाऱ्या मीना प्रभू व त्यांचे पती सुधाकर प्रभू यांच्या कल्पनेतून प्रभू ज्ञानमंदिर साकारले आहे. पुण्यातील नवी पेठेतल्या एस. एम. जोशी सभागृह आवारातील लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीत ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाचे उद््घाटन पुण्यात पाच मे रोजी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले.  
 
डॉ. मीना प्रभू म्हणाल्या, प्रभू वाचनमंदिर हे ग्रंथालय सुमारे दोन हजार चौ. फुटांच्या जागेत अाहे. जागेची मर्यादा लक्षात घेता येथे किंडलच्या माध्यमातून पुस्तके उपलब्ध करून दिली तर ते वाचकांसाठीही अधिक सोयीचे होईल, असे वाटले. त्यामुळे किंडलचे अनलिमिटेड सबस्क्रिप्शन घेऊन आम्ही इथे येणाऱ्या वाचकांसाठी सुमारे दहा लाख पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकामागे दरदिवशी फक्त ५० रुपये इतके शुल्क आकारण्यात येईल. वाचकांसाठी येथे १२ किंडल गॅझेट ठेवले आहेत. अमेरिका, युरोप खंडातील देशांमध्ये सर्वसामान्य जीवनात किंडलचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. पण भारतात अजूनही किंडल तितके परिचित नाही. त्यामुळे किंडल लायब्ररी सुरू करण्याचे मनावर घेतले. अशा प्रकारचे किंडल ग्रंथालय भारतात अन्यत्र कुठेही नसल्याचे त्यांनी सांगितले. 

नवतंत्रज्ञानयुक्त अभ्यासिका   
प्रभू ज्ञानमंदिरासंदर्भात अनुरती कुलकर्णी म्हणाल्या, या ग्रंथालयात लेझर प्रोजेक्टर आणि अत्युच्च ध्वनियंत्रणा वापरून बनवलेले दृक्-श्राव्य दालन आहे. तिथे प्रवास, निसर्ग, खगोलिक, भौगोलिक व इतर फिल्म्स पाहण्यासाठी आरामदायी सोय आहे. प्रभू ज्ञानमंदिरात संपूर्ण संगणकीकृत आणि वाय-फायसह सुसज्ज अभ्यासिका आहे. तरुणांनी बनवलेले माहितीपट आणि लघुपट दाखवण्याची हक्काची जागा म्हणून प्रभू ज्ञानमंदिर ओळखले जावे, असाही मानस आहे. त्याशिवाय या ग्रंथालयात अभ्यासिका असून त्यात १२ विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...