आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदू मिल जमिनीसाठी आंदोलन पुन्हा पेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आगामी महापरिनिर्वाणदिनी इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाची पायाभरणी करण्यात यावी, या मागणीसाठी हजारो आंबेडकरी अनुयायी 22 नोव्हेंबर रोजी इंदू मिलचा ताबा घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते विजय कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

आंबेडकर संघटनांच्या लढय़ानंतर मागील महापरिनिर्वाण दिनी दादर येथील दी इंडिया युनायटेड (इंदू) मिलची साडेबारा एकर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारकडून लोकसभेत करण्यात आली होती. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळानेही आपल्या मालकीची ही जमीन देण्याची घोषणा केली. मात्र, ती अद्याप राज्य शासनाला सुपूर्द करण्यात आलेली नाही. स्मारक बांधण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात राज्य शासन वेळकाढूपणा करत असल्याबद्दल कांबळे यांनी खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्ष इंदू मिल स्मारकाचा राजकीय लाभ उठवण्याची शक्यता आहे. निवडणुकींच्या तोंडावर दलितांची मते मिळवण्यासाठी स्मारकाची घोषणा करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप कांबळे यांनी केला.

‘इंदू मिल स्मारकासाठी द्या, नाहीतर चैत्यभूमीशेजारी भराव टाकून 100 एकर जागा उपलब्ध करा,’ अशी आंबेडकरी अनुयायांची जुनीच मागणी होती. मात्र, रामदास आठवले आणि आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिल आंदोलनात घुसखोरी करून र्शेय लाटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कांबळे यांनी केला.

ठोस आश्वासनाशिवाय माघार नाही : कांबळे
22 नोव्हेंबर रोजी मिलच्या गेटवर ‘जमीन ताबा’ आंदोलन केले जाईल. त्यासाठी राज्यातील हजारो आंबेडकरी अनुयायी येतील. 6 डिसेंबर रोजी स्मारकाची पायाभरणी आणि प्राधिकरणाची स्थापना याविषयी ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे कांबळे यांनी सांगितले.