आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industries Minister Narayan Rane, Latest News In Divya Marathi

बंड शमविण्यासाठी नारायण राणेंची नवी मागणी, आता हवे प्रदेशाध्यक्षपदासह वजनदार खाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसमध्ये नाराज असलेले व काहीसे एकटे पडलेले उद्योगमंत्री नारायण राणे सध्या दिल्ली दरबारी आहेत. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर ते सोनिया गांधींच्या भेटीच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान राणेंनी राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले तरी त्यांनी पक्षश्रेष्ठींपुढे काही अटी ठेवल्याचे कळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्षपद व महसूल मंत्रालयासारखे मलईदार खाते मिळावे अशी राणेंची इच्छा आहे. दरम्यान, निवडणूक काही दिवसावर आली असताना हे बदल होणे शक्य नसतानाही राणे अशी अट ठेवत असल्याने त्यांच्या मनात पक्षातून बाहेर पडण्याचा विचार डोकावतोय की काय असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे 'नारायण राणे' या प्रकरणाचे काय करायचे असा सवाल मुख्यमंत्री चव्हाण व काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पडला आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे काल दुपारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. राणे यांनी बुधवारी रात्री राहुल गांधी यांच्यासमवेत फोनवरून चर्चा केली तसेच मी दिल्लीत येऊन भेटतो असे सांगितले होते. त्यानुसार काल सायंकाळी साडेचार वाजता राहुल गांधींची भेट घेतली. तसेच आपल्या तक्ररीचा पाढा वाचला. राहुल यांनी राणेंचे म्हणणे बारकाईने ऐकून घेतले व पक्षाध्यक्ष सोनिया यांच्यापर्यंत आपल्या भावना पोहचू असे सांगितले. यामुळे राणेंना थोडे बळ आले. त्यानंतर राणेंनी दिल्लीतील काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीबाबत आक्षेप नोंदवले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारभारात बदल केला नाही विधानसभेला पराभव निश्चित आहे असे निदर्शनास आणून दिले. यावर आपल्याला प्रदेशाध्यक्षपद दिले तर आपण महाराष्ट्र पिंजून काढू व पक्षाला पुन्हा सत्तेपर्यंत पोहचवू असे राणेंनी सांगितले. याचबरोबर महसूल मंत्रालयासारखे मलईदार खातेही देण्यात येऊन आपले राजकीय वजन वाढवावे अशी मागणी केली. मात्र, राणेंच्या मागण्यांचा विचार होण्याची कोणतेही शक्यता नाही. दरम्यान, राणेंच्या तक्रारी व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यांना कोणतेही आश्वासन दिले जाणार नाही. तसेच त्यांची मागणीही पूर्ण केली जाणार नसल्याचे काँग्रेसच्या वर्तुळातून समजते आहे.
सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी राणे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची वर्षावर भेट घेऊन दोन तास चर्चा केली होती. यावेळी राणेंच्या तक्रारी ऐकून घेत तुमचे म्हणणे दिल्लीत मांडा असे सांगितले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर राणेंनी माणिकराव ठाकरे व चव्हाण आम्ही तिघे सोनियांना भेटणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. मात्र, आज राणे एकटेच दिल्लीत असल्याचे दिसून येत आहे. यावरून मुख्यमंत्री चव्हाण यांनी राणेंच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टच झाले आहे. तरीही राणेंनी हा विषय प्रतिष्ठेचा करीत दिल्ली दरबारी हजेरी लावली आहे.