आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांच्या मानपानात मुंबापुरी \'अस्वच्छ\'; मेहता आणि दराडे यांच्यातील बेबनाव मनपाच्या मुळावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या  वर्षी स्वच्छ पाहणीत मुंबई दहाव्या स्थानी होती. यंदा मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली गेली. स्वच्छ अभियानात देशाच्या आर्थिक राजधानीच्या घसगुंडीस पालिका प्रशासनाने नागरिकांनाच दोषी ठरवले असले तरी मुंबईच्या नाचक्कीस आयुक्त अजोय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याची चर्चा सध्या पालिका वर्तुळात रंगली आहे.  

मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असतो. त्याप्रमाणे अजोय मेहतादेखील मर्जीतील आहेत. मात्र, २०१५ मध्ये डाॅ. पल्लवी दराडे आदिवासी विकास विभागातून (नागपूर) पालिकेत प्रतिनियुक्तीवर आल्या. दराडे आयआरएस तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांच्या त्या पत्नी आहेत. आयएएस नसतानाही दराडे यांची पालिकेत वर्णी लागली. त्यामुळे दराडे यांच्या विरोधात पालिकेतील इतर चार आयएएस लाॅबीचा रोष होताच. तरीसुद्घा दराडे यांना घनकचरा, शिक्षण, विधी, अतिक्रमण आणि सामान्य प्रशासन अशी महत्त्वाची खाती िमळाली. दराडे आणि मेहता दोघेही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे वेळोवेळी दोघांत खटके उडू लागले  आहेत.  

त्यातच मागच्या वर्षी पालिकेचा स्वच्छता सर्वेक्षणात देशात दहावा क्रमांक आला. घनकचरा विभाग त्या वेळी दराडे यांच्याकडे होता. त्यामुळे दराडे यांची वाहवा झाली. आयुक्त या नात्याने अजोय मेहता यांनी हा पुरस्कार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, त्याच दिवशी मुंबईत “मेक इन इंडिया’चा कार्यक्रम होता. त्याला आयुक्त म्हणून अजोय मेहता यांना हजर राहावे लागले. त्यामुळे दराडे यांनी तो पुरस्कार स्वीकारला. स्वच्छता अभियानात पल्लवी दराडे यांनी प्रसिद्धीसाठी खाजगी एजन्सी नेमली, असाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे दराडे यांच्याकडील घनकचरा, शिक्षण, विधी आदी महत्त्वाचे विभाग रिशफलिंगमध्ये २०१६ च्या मे महिन्यात काढण्यात आले.  

मागच्या वर्षीप्रमाणे स्वच्छता सर्वेक्षणात मुंबई टाॅप टेनमध्ये राहावी यासाठी आयुक्त अजोय मोहता यांनी मेहनत घेतली. त्यासाठी एका सहायक आयुक्ताची खास नेमणूकही केली. महिन्याला घनकचरा विभागाच्या बैठका आयुक्त जातीने घेत होते. तरीसुद्धा दराडे यांनी घनकचरा व्यवस्थापनात केलेली किमया यंदा काही साध्य झाली नाही. आयुक्तांनी यंदा स्वच्छता अभियानाचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला होता. पण प्रत्यक्षात यंदा आयुक्तांचे चांगलेच तोंड पोळले. नागरिकांनी मतदान केले नाही, त्यामुळे मुंबईचा क्रमांक घसरला, असे आता पालिका प्रशासन म्हणते आहे. तर शिवसेनेला तोंडावर पाडण्यासाठी भाजपने गेम केल्याचे शिवसेनेचे महापौर सांगत आहेत. पण प्रशासनात मात्र आयुक्तांमधील बेबनाव कारणीभतू असल्याची चर्चा आहे.  

दराडे यांचे उपक्रम  
- मुंबईतील ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया उपक्रम.  
- झाडांच्या फांद्यापासून कोळशाच्या विटा बनवणारा प्रकल्प घाटकोपर येथे चालू केला.  
- कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे ५ टक्के प्रमाण ३९ टक्क्यांवर नेले.  
- घरगुती, सार्वजनिक, पे अँड युज शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. हागणदारीमुक्त वाॅर्ड घोषित. 
- सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीपटाची अचानक तपासणी. एकाच दिवशी २८८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
बातम्या आणखी आहेत...