आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे खासदार संजय काकडे चौकशीच्या घेऱ्यात, भुजबळ प्रकरणातही काकडेंचे कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे पुण्यातील राज्यसभा खासदार व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चाैकशी सुरू अाहे. पुण्यातील भाजप आमदार मेधा कुलकर्णी व काकडे यांच्यातील वादामुळे चर्चेत अालेल्या काकडेंच्या अडचणींत अाणखी वाढ झालेली दिसते. त्यांच्या केआयपील  तसेच आयव्हीआरसीएल या कंपनीतील कागदपत्रांची तपासणी करून संबंधितांवर गुन्हाही दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. 
   
एसीबीच्या ठाणे शाखेतर्फे २३ जून रोजी काढलेल्या  प्रेस नोटमध्ये तत्कालीन  मुख्य अभियंता (सेवानिवृत्त)  प्रकाश ममदापुरे, तत्कालीन अधीक्षक अभियंता (सेवानिवृत्त) किसन जाधव, तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र जवंजाळ यांच्यासाेबतच केआयपील, आरव्हीआरसीएल या कंपन्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.    

पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या (एनडीए) विस्ताराचे काम काकडे यांच्या  कंपनीकडे देण्यात आलेले असताना कोपरे गावाच्या पुनवर्सन प्रकरणावरून सध्या भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार वाद सूरू आहेत. आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुनवर्सन प्रकरणात आंदोलकांची बाजू घेतल्याने वैतागलेल्या काकडे यांनी त्यांना धमकी दिल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचले आहे. हे होत असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या ठाणे शाखेने सायन-पनवेल हायवेच्या टेंडर प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरणात काकडे यांच्या  कार्यालयात जाऊन कागदपत्रांची तपासणी करत गुन्हे दाखल केले.    

सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे येथील २० किलोमीटर मार्गाचे काम काकडे यांच्या  काकडे इन्फ्रास्ट्रक्चर  या कंपनीला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या काळात देण्यात आले होते. काकडे यांच्या कंपनीला कामाचा अनुभव नसताना त्यांना हे काम कोणत्या निकषावर देण्यात आले याची चौकशी करावी, अशी याचिका माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयात दाखल  केली होती. या प्रकरणात मार्च  २०१७ मध्ये झालेल्या  सुनावणीत न्यायालयाने  खुली चौकशी करण्याचे आदेश ‘एसीबी’ला  दिले होते. तसेच तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. लाचलुचपत  विभागाने याप्रकरणी मुख्य अभियंता, माजी अभियंता यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली होती. काकडे यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. आता काकडे यांच्या  कार्यालयातून काही कागदपत्रे जप्त करण्यात अाली अाहेत.  

सायन-पनवेल रोड प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत प्रकाश ममदापुरे, किसन माने, राजेंद्र जवंजाळ यांनी सरकारी सेवेत असतानाही पदाचा व अधिकाराचा जाणीवपूर्वक दुरुपयोग करत केआयपीएल तसेच अारव्हीआरसीएल या कंपन्यांशी संगनमत करून दोन्ही कंपन्यांना फायदा मिळवून दिला. हे सर्व लक्षात घेता त्यांच्याविराेधात गुन्हे दाखल करण्यात आले अाहेत. या गुन्ह्यांचा तपास ठाणे एसीबी विभागाचे अपर पोलिस अधीक्षक किसन गवळी करत आहेत, असे   एसीबीच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात अाले अाहे.

भुजबळ प्रकरणातही काकडेंचे कनेक्शन  
यापूर्वी संजय काकडे यांची छगन भुजबळ यांच्या मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने चौकशी केली होती. भुजबळ यांच्या कंपनीत काकडे यांनी १० कोटी रुपये गुंतवले असल्याचे ईडीच्या निदर्शनास अाल्यामुळे ही चाैकशी करण्यात अाली हाेती. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात काकडे यांच्या कंपनीचा उल्लेख आहे. 

राष्ट्रवादीतून आले अन‌् भाजपचे खासदार झाले   
संजय काकडे हे भाजपचे खासदार असले तरी त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्याने त्यांच्यापुढे अडचणी उभ्या राहू शकतात. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आली नाही तर राजसंन्यास घेऊ, अशा प्रकारचे वक्तव्य करून काकडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. काकडे आधी राष्ट्रवादीत हाेते, मात्र बदलते राजकीय वारे लक्षात घेऊन त्यांनी भाजपमध्ये येऊन राज्यसभा सदस्यत्व मिळवले हाेते.
बातम्या आणखी आहेत...