आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयएनएस'साठी सरसावले खासदार; 22 खासदारांनी संरक्षण सचिवांना पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाकिस्तानविरुद्ध 1971 मध्ये झालेल्या युद्धावेळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे विमानवाहू जहाज ‘आयएनएस विक्रांत’ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. हे जहाज भंगारात विकू नये, अशा आशयाची विनंती महाराष्ट्राच्या 22 खासदारांनी देशाचे संरक्षण सचिव आर. के. माथूर यांच्याकडे केली आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली. आयएनएस विक्रांत भंगारात न विकता त्यावर शहीद स्मारक बनवण्याच्या योजनेचा पुनर्विचार करण्यात यावा. यासाठी राज्य सरकारकडून निधी मिळत नसेल तर केंद्र सरकारकडून मदत घेण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. विक्रांतला वाचवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पूर्वीच 100 कोटी रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताच त्याला वाचवण्याची मोहीम अधिक तीव्र होऊ शकते. सध्या हे जहाज मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ उभे असून 27 मे रोजी त्याला भंगारात पाठवले जाणार आहे. यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष परवानगीही घेतली आहे.

शिवसेना-भाजप खासदारांचे पत्र
पंतप्रधान, मंत्रिमंडळ तसेच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी अद्याप होणे बाकी आहे. मात्र, राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे खासदार आतापासून कामाला लागले आहेत. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी राज्यातील 22 खासदारांनी संरक्षण सचिवांना पत्र लिहिले आहे. नवीन सरकार स्थापन होईस्तोवर विक्रांतला भंगारात काढू नये, अशी विनंती खासदारांनी या पत्रातून केली आहे.

ऐतिहासिक आयएनएस विक्रांत
आयएनएस विक्रांत हे भारतीय नौदलातील मॅजेस्टिक वर्गातील हलके विमानवाहू जहाज आहे. 1945 मध्ये तयार करण्यात आलेले हे जहाज भारताने 1957 मध्ये विकत घेतले. ते 3 नोव्हेंबर 1961 रोजी भारतीय आरमारात दाखल झाले होते. 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी या जहाजाने नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.