आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व एसएनसीयूमध्ये अाॅक्सिजन यंत्र बसवा; अाराेग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची सूचना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाशिक येथील अर्भक मृत्यू व राज्यातील उपजत मृत्यूंची कारणमीमांसा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीची पहिली बैठक मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नाशिकसह राज्यातील १२ विशेष नवजात उपचार कक्षाचे (एसएनसीयू) श्रेणीवर्धन करण्यात येणार असून त्या माध्यमातून २३० अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात अाला. तसेच सांगली, धुळे, यवतमाळ, कळवण, अहेरी, अचलपूर, धारणी अशा आठ ठिकाणी नव्याने विशेष नवजात उपचार कक्षांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाशिकसह अमरावती, चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात नवजात अतिदक्षता केंद्र (एनआयसीयू) प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  

नाशिक येथील अर्भक मृत्यू तसेच राज्यात होणाऱ्या उपजत मृत्यूंची नेमकी कारणे समजून घेण्यासाठी बालरोग तज्ज्ञ, निओनॅटल तज्ज्ञ यांची समिती नियुक्त करण्यात आली होती, त्यांची बैठक झाली. या वेळी निओनॅटल तज्ज्ञ डॉ. बी. एस. अवस्थी, डॉ. एन. एस. काबरा, अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रेखा डावर, केईएमच्या निओनॅटॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. रुची नानावटी तज्ज्ञ उपस्थित होते.  

डाॅ. सावंत यांनी सांगितले, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये १५ दिवसांत अतिरिक्त बेड वाढविण्यात येणार असून राज्यातील अन्य १२ ठिकाणच्या एसएनसीयूंचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नाशिक एसएनसीयूमध्ये सध्या २० बेड असून अतिरिक्त २८ खाटांची त्यात भर पडणार आहे. अकोला येथे ४८ बेड असून त्यात २० खाटांची भर पडणार आहे. जळगाव येथे २० बेड असून २८ खाटांची भर पडणार असून चंद्रपूर येथे १६ बेड असून त्यात २० अतिरिक्त बेड वाढणार आहे. जालना येथे १६ बेड असून २७ अतिरिक्त बेड मिळणार आहे. गडचिरोली येथे १२ बेड असून ३० अतिरिक्त बेडची संख्या वाढणार आहे. अमरावती येथे २२ बेड असून अाणखी १२ बेड वाढतील. १६ बेड असलेल्या उस्मानाबादेत अाणखी १२ तर २१ बेड असलेल्या बुलडाण्यात १२ बेड वाढतील. राज्यातील ३६ एसएनसीयूमध्ये सध्या ६६० बेड असून श्रेणीवर्धनामुळे २३० अतिरिक्त बेड वाढून  ही संख्या ८९० हाेईल.  

प्रतिजैविकांबाबत प्राेटाेकाॅल  
नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात नवजात अतिदक्षता कक्ष (एनआयसीयू) उभारण्याचे प्रस्तावित असून याबरोबरच अमरावती आणि चंद्रपूर येथेही प्रायोगिक तत्त्वावर अशाप्रकारचे कक्ष उभारण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या बैठकीत तज्ज्ञांनी बालमृत्यू, कमी वजनाचे अर्भक, त्यांना होणारा जंतुसंसर्ग, प्रतिजैविकांचा (ॲन्टीबायोटिक्स) वापर यासंदर्भात चर्चा करण्यात आली. राज्यातील एसएनसीयूमध्ये सी पॅप (ऑक्सिजन देणारे यंत्र) बसविण्याबाबत समिती सदस्यांनी सुचविले असून नवजात अर्भकांना देण्यात येणाऱ्या प्रतिजैविकांच्या वापराबाबत प्रोटोकॉल तयार करण्यात यावा. त्याचबरोबर एसएनसीयूमधील कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी केईएम रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ विभागामार्फत नर्स तसेच डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...