आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंच्या विरोधात भाजपत असंतोष!, प्रदेशाध्यक्ष न करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविराेधात भाजपत मोठा असंतोष असून त्यांच्याविषयी अनेक नेत्यांनी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांकडे तक्रारी केल्याची माहिती अाहे. १७ जानेवारीला प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षित असून त्या वेळी दानवेंना पुन्हा संधी देण्यात येऊ नये, अशा मागणीची पत्रे शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहेत. या तक्रारींचे पडसाद उमटण्याची चिन्हे असल्याने दानवे यांनीही दिल्लीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बाेलले जाते. दरम्यान, याबाबत दानवेंची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध हाेऊ शकले नाहीत.
सन २०१४ वर्षाअखेरीस राज्यात भाजप सत्तेत आला, त्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यपदाची धुरा होती अाणि त्यांच्याकडील या पदाचा कालावधी १० महिन्यांसाठी शिल्लक होता. अशा वेळी पक्षश्रेष्ठींनी दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्रिपदावरून पायउतार करत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मात्र गेल्या वर्षभराच्या काळात दानवे यांना पक्षावर फारशी पकड मिळवता आली तर नाहीच, उलट कार्यकर्ते व संघटकांची मोठी नाराजी मात्र त्यांनी ओढवून घेतली. सध्या भाजपत जिल्हा अध्यक्षांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार असून त्याची मुदत तीन वर्षे असेल. १७ जानेवारीला प्रदेशाध्यक्षपदाची निवड जाहीर केली जाईल अाणि त्यानंतर २१ जानेवारीला राष्ट्रीय अध्यक्षाची निवड हाेईल.
सत्ता आल्यानंतर अनुभवी कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना पक्षात मान मिळेल, असे वाटत होते. पण त्यांना डावलले तर गेलेच, पण जातीय राजकारण करून ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद, जालनातील नियुक्त्या करण्यात आल्या, अशा तक्रारी अनेक नेत्यांनी शहा यांच्याकडे पाठवल्या अाहेत.
मेहता, लोणीकरही नाराज
कॅबिनेटमंत्री प्रकाश मेहता तसेच बबनराव लोणीकर यांनीही दानवेंविराेधात अमित शहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती अाहे. गृहनिर्माण मंत्री मेहता यांचा बंगला दानवे यांना देण्यात आला होता. मात्र या बंगल्यात चुकीच्या पद्धतीने काम होत असल्याची तक्रार करत मेहता यांनी दाेनच महिन्यांपूर्वी हा बंगला परत घेतला. तर, दानवे पक्षात गटबाजी करत असल्याची तक्रार त्यांच्याच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री लोणीकरांनी केली होती. याशिवाय महामंडळाची पदे देण्यासाठी दानवे पदाचा गैरवापर करत असल्याच्या तक्रारीही दिल्लीत गेल्या अाहेत.