आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International And Solapur Drugs Racket Connection Press Meet Commissioner

सोलापूरच्या अमली पदार्थांच्या धंद्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर लागेबांधे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सोलापुरातील इफेड्रीन अमली पदार्थांच्या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असून अमेरिकेचे पोलिसही या रॅकेटच्या मागावर असल्याचा गाैप्यस्फाेट ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनेक वर्षांपासून विकी गोस्वामी या आंतरराष्ट्रीय ड्रग माफियाच्या संपर्कात असल्याचेही तपासात समाेर अाले अाहे. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी साेलापुरातील अॅव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीचे दोन संचालक प्रमुख सुत्रधार असलेल्या पुनीत शृंगीसह आठ जणांना आतापर्यंत अटक केली. दरम्यान, अॅव्हाॅन कंपनीचा परवाना रद्द करण्याची शिफारस अन्न अाैषध प्रशासनाने केली अाहे.

या प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार असलेल्या पुनीत श्रृंगी याला मंगळवारी रात्री ठाण्यातून अटक करण्यात अाली हाती. त्यापाठाेपाठ बुधवारी सकाळी अॅव्हॉन लाईफ सायन्सेसचे संचालक हरजीत सिंग गील आणि मनोज जैन यांनाही अटक करण्यात आली. अटकेच्या वेळी हरजीत सिंगच्या गाडीतून दहा किलो इफेड्रीन जप्त करण्यात आल्याची माहिती परमबीर सिंग यांनी दिली. सप्टेंबर २०१५ पासून पुनीत श्रृंगी हा या कंपनीत व्यवस्थापक या पदावर कार्यरत असून त्याच्याच मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तब्बल १८०० किलो इफेड्रीन कंपनीबाहेर काढण्यात आले. या आधीसुद्धा या कंपनीतून इफेड्रीन केनियाला पाठवण्यात आल्याची बाब तपासादरम्यान समोर अाली अाहे. सध्या केनियामध्ये जामिनावर असलेला आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी याचाही माग काढला जाणार आहे. अॅव्हॉन कंपनीचा संचालक मनोज जैन यानेही या अगोदर अनेक परदेश दौरे केल्याचे तपासात उघड झाले असून त्या दौऱ्यांचा इफेड्रीनच्या तस्करीशी काही संबंध आहे का याची तपासणी केली जाणार असल्याचेही पोलिस आयुक्त म्हणाले. आतापर्यंत या प्रकरणात एकूण २५०० कोटींचा इफेड्रीनचा अवैध साठा जप्त करण्यात आला असून अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे.

‘एफडीए’हीकरणार तक्रार
कर्करोगआणि दम्याच्या उपचारादरम्यान इफेड्रीन पासून बनवलेल्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे संबंधित औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना इफेड्रीनचा साठा करण्याबाबत राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना घ्यावा लागतो. तसेच इफेड्रीन वापरासंबंधीची संपुर्ण माहिती नियमितपणे या विभागाला देणेही औषध कंपन्यांना बंधनकारक आहे. मात्र साेलापुरातील अॅव्हॉन लाईफ सायन्सेस या कंपनीने इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे इफेड्रीनचा साठा करून या कायद्याचा भंग केला अाहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनही या कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली.

अमेरिकन पाेलिसांनी घेतली अायुक्तांची भेट
या टोळीचे आंतराष्ट्रीय तस्करांशी संबंध असून त्याचे धागे अनेक देशात पसरले असल्याची बाब स्पष्ट करताना सिंग म्हणाले की, अमेरिकी पोलिसांच्या एका पथकाने नुकतीच ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. ते सुद्धा आम्ही करत असलेल्या तपासाची माहिती घेत अाहेत. या रॅकेटबाबत अमेरिकन पाेलिस ठाणे पाेलिसांची मदत घेणार अाहेत.