मुंबई - गोव्यामध्ये २० ते ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणा-या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया २०१४' म्हणजेच इफ्फीतील इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन परेश मोकाशी दिग्दर्शित ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाने होणार आहे. या चित्रपटाचे १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शन होणार असून बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांना या चित्रपटाच्या निमित्ताने अनोखी मेजवानी मिळणार आहे.
एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाबरोबर एस्सेलचेच 'डॉ. प्रकाश बाबा आमटे : द रिअल हीरो' आणि 'फॅन्ड्री'देखील इंडियन पॅनोरमामध्ये दाखवले जाणार आहेत. परेश मोकाशी यांनी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटानंतर चार ते पाच वर्षांनी ‘एलिझाबेथ ..’च्या निमित्ताने कमबॅक केले आहे. या चित्रपटाची कथा पंढरपूरच्या शाळकरी मुलांभोवती फिरते.
मुलांच्या भावविश्वातून एक नवी कथा साकारायचा प्रयत्न कथालेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी केला आहे. दिवंगत आनंद मोडक यांचे संगीत या चित्रपटास लाभले आहे.
इतिहास संशोधनात घालवली चार वर्षे
'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपट केल्यानंतर चार वर्षे परेश यांनी प्राचीन इतिहासाचा अभ्यास करून त्याच्या डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने एक प्रकल्पच हाती घेतला आहे. त्यात त्यांनी प्राचीन इतिहासाचा सगळा डेटाबेसच गोळा केला. या प्रकल्पाला मूर्त रूपापर्यंत आणल्यानंतर परेश यांनी ‘एलिझाबेथ..’चे दिग्दर्शन सुरू केले.