आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Yuva Sena Chief Aditya Thackeray In Divya Marathi, Shiv Sena

खास मुलाखत: राष्ट्रीय पक्षांचा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा डाव - अ‍ादित्य ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय पक्ष हे प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु त्यांना यश येणार नाही. कारण प्रत्येक राज्याची प्रादेशिक अस्मिता असते आणि तेथील नागरिकांना त्याबद्दल प्रचंड प्रेम असते. शिवसेना, अकाली दल, तेलगू देसमला संपवण्याचा प्रयत्न सुरू अ‍ाहे; परंतु शिवसेनेला कोणीही संपवू शकणार नाही, असे परखड मत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

* अन्य राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी अ‍ापला संपर्क आहे का?
- गेल्या वर्षभरापासून मी वेगवेगळ्या विषयांवर विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहे. ही चर्चा पुढे वाढतच जाईल. माझे तर मत आहे की, देशात प्रादेशिक पक्ष असायलाच हवेत. त्यामुळे गुजरातमध्ये ‘जय हिंद जय गुजरात’, तामिळनाडूमध्ये ‘जय हिंद जय तामिळनाडू’ तर महाराष्ट्रात ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ बोलतात. ही प्रादेशिकताच देशाची एकता आहे. प्रादेशिक आवाज हा वर आलाच पाहिजे.
* इतर राज्यांत प्रादेशिक पक्षांना जनतेने सत्ता दिली, मग तुम्हाला का नाही?
- १९९९ मध्ये युतीने सहा महिने अगोदर सत्ता सोडल्यामुळे कदाचित पुन्हा सत्ता मिळाली नसावी. खरे तर आम्ही तेव्हाही विकासाच्या योजना आखल्या. ५५ उड्डाणपूल बांधले, एक्स्प्रेस वे बांधला. त्यामुळे आयटी कंपन्या पुण्यात येऊ शकल्या. कृष्णा खोरे प्रकल्पही सुरू केला, परंतु युतीच्या कार्यकाळात पूर्ण झाला नाही. बंगालमध्ये ममतांना दुस-यांदा सत्ता मिळाली आहे. आता आम्हालाही जनता दुस-यांदा नक्कीच सत्ता देईल.
* महिन्यापूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना यात काय फरक आहे?
- एक महिन्यापूर्वी जेव्हा युतीची बोलणी सुरू होती तेव्हाची शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये खूप फरक पडला आहे. युती तुटल्याचे मला दुःख आहे, परंतु त्याचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही. कारण गावागावात, घराघरांत शिवसेना पोहोचलेली आहे. जेवढे मोठे आव्हान असते तेवढा मोठा विजय शिवसेना प्राप्त करते. त्यामुळे शिवसेनेने हेही आव्हान स्वीकारले असून ते आम्ही यशस्वीपणे पेलू. आमच्या ‘मिशन १५०’ नुसार राज्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल.
* सत्ता आल्यावर मुख्यमंत्री कोण?
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
* नरेंद्र मोदी युवकांना आकर्षित करीत आहेत, परंतु शिवसेना त्यात यशस्वी होताना दिसत नाही...
- मोदी यांनी युवकांना आकर्षित केले ते दिल्लीसाठी. राज्यात भाजपकडे चेहराच नाही आणि मोदी मुख्यमंत्री बनणार नसल्याने त्यांच्याकडे आता युवक आकर्षित होत नाहीत. राज्यात युवकांची मोठी शक्ती आहे, परंतु त्यांच्या शिक्षणाची, नोकरीची मोठी समस्या आहे. शिक्षण बहुकेंद्रित असावे याकडे आम्ही लक्ष देणार असून शिक्षणात क्रांती आणण्याचाही संकल्प आहे. आम्ही फक्त बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत अ‍ाहोत. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आम्ही या योजना मांडलेल्या आहेत. अ‍ाणि त्यामुळेच युवक शिवसेनेकडे आकर्षित होत अ‍ाहेत.
* युवकांनी शिवसेनेलाच मते का द्यावी?
- युवकांच्या जेवढ्या समस्या आम्हाला ठाऊक आहेत वा आम्हाला जेवढी त्यांची काळजी आहे, तेवढी काेणत्या पक्षाला आहे? क्रीडा ते शिक्षण सर्वच आघाड्यांवर एकाही पक्षाकडे ठोस व्हिजन नाही. गेल्या चार वर्षांपासून मी स्वतः युवा सेनेच्या माध्यमातून युवकांच्या वेगवेगळ्या समस्यांवर काम करतोय. सत्ता आल्यावर युवकांच्या सर्व समस्या सोडवण्याची मी शपथ घेतलीय. मी २४ वर्षांचा आहे आणि मला युवकांच्या समस्या चांगल्या ठाऊक आहेत. भाजपला तर अ‍ाजचा २४ वर्षांचा मुलगा ‘इमॅच्युअर’ आहे असे वाटते. त्यामुळे त्यांना युवकांची किती जाण आहे ते दिसून आले अ‍ाहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष तर महाराष्ट्र तोडायला निघालेत. राज्यात स्थिरता नसेल तर उद्योगधंदे कसे येतील आणि बेरोजगारी कशी संपेल?
* युती तुटण्याचे मुख्य कारण?
- महायुतीच्या जागावाटपाबाबत भाजपचा अडेलतट्टूपणा हेच युती तुटण्याचे मुख्य कारण. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटलीच नसती. आम्हाला ओम माथूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यास सांगितले होते. आम्ही त्यांच्याशीच चर्चा केल्याने भाजपच्या काही नेत्यांचा इगो दुखावला आणि त्यांनी टोकाचा निर्णय घेत युती तोडली.