आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investigate Bhujbal Son Father With Nice, Appoint SIT HIgh Court Order

भुजबळ पिता-पुत्रासह पुतण्याचीही चौकशी, ‘एसआयटी’ नेमण्याचे उच्च न्यायालयाचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नियमबाह्य पद्धतीने दिलेली कंत्राटे, मनी लॉंड्रींग, बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष समिती नेमून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा आमदार पंकज, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ यांची चौकशी करावी व फेब्रुवारीअखेर अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी भुजबळांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्यावर कारवाईसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री असताना भुजबळांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व निकटवर्तीयांना नियम डावलून कोट्यवधींची बेकायदा कंत्राटे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील नव्या इमारतीच्या बांधकामातही त्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मंजुरीही दिली आहे. त्यातच आता दमानिया यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने समिती नेमण्याचे आदेश दिल्याने भुजबळांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचे आरोपही याचिकेत करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करणे योग्य राहील, असे न्यायालयाने सांगितले आहे.

एकत्रित चौकशी करा
छगन भुजबळ, त्यांचे कुटुंबीय आणि मुंबई एज्युकेशन ट्रस्टची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभाग, अंमलबजावणी संचालनालय आणि विशेष महासंचालक यांनी एकत्रित समिती स्थापन करून चौकशी करावी. तसेच याबाबतचा अहवाल २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत सादर करावा, असेही निर्देश न्यायालयाने संबंधित यंत्रणांना दिले.